छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश; सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पीजी इन्स्टिट्यूट सुरू करणार

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश; सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पीजी इन्स्टिट्यूट सुरू करणार

नाशिक : सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना विधानसभा सभागृहात केली. नाशिकमध्ये पीजी इन्स्टिट्यूट सुरू करण्याच्या छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

नाशिकच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शासकीय पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सतत प्रयत्न सुरू होते.यासाठी त्यांनी नुकतीच त्यांच्या दालनात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासोबत बैठकही घेतली होती.

त्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नाशिकच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी करून याठिकाणी पीजी इन्स्टिट्यूट सुरू करण्याचे सूतोवाच दिले होते. मात्र त्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात नाशिक येथील शासकीय वैद्यकीय पीजी इन्स्टिट्यूटचा उल्लेख नव्हता त्यामुळे ना. छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नाशिक मध्ये पीजी इन्स्टिट्यूट सुरू करून त्याची तरतूद करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर आज विधिमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पीजी इन्स्टिट्यूट सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नाशिक मध्ये पीजी इन्स्टिट्यूट सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com