वाहनधारकांनो! पेट्रोल स्वस्त होण्यासाठी दहा दिवस वाट पाहावी लागणार
स्थानिक बातम्या

वाहनधारकांनो! पेट्रोल स्वस्त होण्यासाठी दहा दिवस वाट पाहावी लागणार

Gokul Pawar

नाशिक । सौदी अरेबियाने छेडलेल्या कच्च्या तेलाच्या किंमत युद्धाचा थेट फायदा काही प्रमाणात भारतीय वाहनचालाकांनाही होणार आहे. येत्या 10 दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी कपात होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 30 टक्क्यांनी कपात झाली होती. ही किंमत 35 डॉलर प्रति बॅरल झाली होती. मात्र, याचा थेट लाभ भारतीय वाहनचालकांना झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्या हे दर 15 दिवसांचा आढावा घेवून ठरवितात. यामुळे पुढील काही दिवसांत देशातील इंधनाच्या किंमती कमी होतील. यामुळे इंधनाच्या दरांमध्ये कपातीसाठी वाहनचालकांना वाट पहावी लागणार आहे.

असे झाल्यास पुढील काळात इंधानाच्या किंमती 5 ते 6 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत जरी 35 डॉलर असली तरी देशातील दर हे इंडियन बास्केटवर ठरविले जातात. मात्र, इंडियन बॅरलची किंमत आताही 45 डॉलर प्रति बॅरल आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे.

यामुळेही पेट्रोलियम कंपन्यांना दर कपात करण्यात अडचणी येणार आहेत. याशिवाय सरकार कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील सीमाशुल्क वाढविण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही सरकारने दर कपातीचा फायदा ग्राहकांना मिळवून दिला नव्हता. सरकारवर महागाईचा दबाव वाढत आहे. यामुळे जर सरकारने कर वाढविला नाही, तर त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळू शकतो.

जून 2017 पासून इंधनाचे दर हे आतंरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार रोज बदलतात. हे भाव मागील 15 दिवसावर आधारित असतात. भारतातील प्रत्येक राज्यानुसार टॅक्स वेगवेगळे असल्याने दरात फरक असतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर उतरत असल्याने भारतात देखील हे दर रोज कमी होत आहेत.
-विजय ठाकरे उपाध्यक्ष फामपेडा ( महाराष्ट्र राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशन )

Deshdoot
www.deshdoot.com