पंचवटी : रस्त्यावर थुंकणार्‍यावर पंचवटी पोलिसांची कारवाई
स्थानिक बातम्या

पंचवटी : रस्त्यावर थुंकणार्‍यावर पंचवटी पोलिसांची कारवाई

Gokul Pawar

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी रस्त्यात थुंकणाऱ्या युवकावर कारवाई करत पंचवटी पोलिसांनी एक हजार रूपये दंड वसूल करीत त्याच्याविरोधात कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला.

करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी संचारबंदी काळात खोकताना, शिंकताना तसेच इतर काय काळजी घ्यावी, याबाबत सर्वच माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येते आहे. मात्र, नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यास पंचवटी पोलिसांनी धडा शिकवला.

पंचवटी पोलिस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालताना पब्लीक अॅड्रेस सिस्टिमवर सुचना करीत होते. फुलेनगर, पेठफाटा भागात हे पथक कार्यरत असताना एक व्यक्ती त्यांना सार्वजनिक रस्त्यांवर थुंकताना आढळला. हा २६ वर्षाचा हा युवक पंचवटीतील सम्राटनगर भागातील रहिवाशी आहे.

करोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची ठरते. करोनाचा प्रसार हा बाधित व्यक्तींद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचतो. त्यात त्या व्यक्तीचे शिंकणे, खोकणे वा थुंकणे कारणीभूत असते.

या पाश्वभूमीवर पोलिसांनी संबंधित युवकाला महापालिकेच्या पथकाद्वारे एक हजार रूपयांचा दंड ठोठवला. तसेच संचारबंदी नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कलम १८८ नुसार गुन्हा देखील दाखल केला. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

अन्यथा कारवाई करावी लागते. पोलिस कारवाईची वेळ येऊ देऊ नये, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com