येवला : कांदा भावात तीन हजारांची घसरण; धुक्याने पिकांना फटका
स्थानिक बातम्या

येवला : कांदा भावात तीन हजारांची घसरण; धुक्याने पिकांना फटका

Gokul Pawar

Gokul Pawar

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक स्थिर असली तरी भाव तब्बल तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. आवक स्थि असूनही भाव कमी होत असल्याने शेतकरी हा भाव पदरात पाडून घेण्यासाठी कादां विक्रीला पसंती देत आहे.

गेल्या आठवड्यात सलग तीन ते चार दिवस धुक्याने कांदा पिक उद्ध्वस्त करण्याचे काम केले. या धुक्याने कांद्याची पात वाकडी होउन कांद्याची वाढ खुंटली. काही रोगांचाही प्रादुर्भाव या कांद्यावर झाला. त्यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट होणार आहे. असे असले तरी गत सप्ताहात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाली. बाजारभावात तीन हजार रुपयापर्यंत घसरण झाल्याचे दिसून आले. धुक्याने रोपांनाही फटका दिला आहे.

मात्र या संकटातुनही शेतकरी सावरत उन्हाळ कांदा लागवडीकडे वळला आहे. यंदाचे कांद्याचे विक्रमी भाव पाहता व पाण्याची उपलब्धता लक्षात घेउन बहुसंख्य शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. कोणतेही संकट आले तरी त्यावर मात करीत उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे.

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापूर आदी ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक 45 हजार 177 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान एक हजार, कमाल 5451 तर सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. अंदरसूल उपबाजारात कांद्याची एकूण आवक 13 हजार 80 क्विंटल झाली आहे. कांद्याचे बाजारभाव किमान एक हजार, कमाल पाच हजार तर सरासरी 3600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर आज बाजार समितीत 800 ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. मात्र बाजारभाव गेल्या काही दिवसापासून कमी होत आहेत. आज बाजारभाव किमान 1 हजार 500 रुपये, कमाल 4 हजार 361 रुपये, तर सरासरी बाजारभाव 3 हजार 800 रुपये होते.

सप्ताहात गहू व बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सप्ताहात गव्हाची एकूण आवक 17 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान 1926, कमाल 2500 तर सरासरी 2100 रुपयांपर्यंत होतेे. बाजरीची एकूण आवक 44 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान 1718, कमाल 1895 तर सरासरी 1750 रुपयांपर्यंत होते. सप्ताहात सोयाबीन टिकून होती तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात सोयबीनची एकूण आवक 78 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान 4151, कमाल 4368 तर सरासरी 4200 रुपयांपर्यंत होते.

मक्याच्या बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. सप्ताहात मक्याची एकूण आवक 21 हजार 119 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान 1760, कमाल 1970 तर सरासरी 1850 रुपये प्रती क्विंटल पर्यंत होते.

Deshdoot
www.deshdoot.com