Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककांद्याच्या दरात घसरण; उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी

कांद्याच्या दरात घसरण; उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी

नाशिक । दोन महिन्यांपूर्वी 20 हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचलेल्या कांद्याचे दर नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवार(दि.4) पासून दोन हजारांच्या खाली आले आहेत. मागील आठवड्यात सरासरी अडीच हजारांच्या आसपास राहिलेले लाल कांद्याचे दर कोसळून मंगळवारी सरासरी 1700रुपये तर बुधवारी 1600रुपयांवर घसरले.

या आठवड्यात कांद्याचे दर अजुनही कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे उत्पादकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. कांद्याचे क्विंटलचे सरासरी दर सोमवारी 2200 रुपये होते.ते मंगळवारी 1700तर बुधवारी 1600 रुपयांपर्यंत खाली आले.

- Advertisement -

मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये रोज सरासरी दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होत होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.3) जिल्ह्यात कांद्याची आवक 1 लाख 77 हजार क्विंटल झाली.त्यानंतर मंगळवार,बुधवारीही हीच परिस्थिती राहिली. तसेच राज्याच्या इतर भागातही कांद्याची आवक वाढलेली असल्याने व देशभर कांद्याचा पुरेसा पुरवठा असल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत.

अवकाळी पाऊस उघडल्यानंतर शेतकर्‍यांनी लागवड केलेला लाल कांदा सध्या मोठ्या प्रमाणात काढणीला आलेला असून तो बाजारात विक्रीसाठी येत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत चालली आहे.राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कांद्याची आवक वाढत आहे.पुरेसा कांदा उपलब्ध असल्याने देशातील मागणी घटत चालल्याने कांद्याचे दर खाली येत असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

निर्यातबंदी उठवावी
देशांतर्गत मागणीपेक्षा कांंद्याचा पुरवठा कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारने 2019च्या सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला किमान निर्यातमूल्य वाढवले. त्यानेही किंमती आटोक्यात येत नसल्याने निर्यांतबंदीचा निर्णय घेतला. तरीही कांद्याच्या किंमतींवर काहीही परिणाम झाला नाही.डिसेंबरच्या मध्यापासून पोळ व लाल कांद्याची आवक वाढत चालली तसे कांद्याचे दर कमी होत चालले आहेत.आवक अशीच वाढत राहणार असल्याने कांद्याचे दर एकदम कोसळू नयेत, यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी जोर धरीत आहेत.

आधी अतिवृष्टीमुळे व आता निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.त्यातच केंद्र सरकारच्या आयात निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे आज राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला 1500 च्या आसपास दर मिळत आहे.सरकारने तात्काळ निर्यात बंदी ऊठवावी.अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करील.
-भारत दिघोळे(अध्यक्ष,राज्य कांदा उत्पादक संघटना)

- Advertisment -

ताज्या बातम्या