नायलॉन मांजामुळे नागरिकांसह पक्षांच्या जिवावर ‘संक्रांत’
स्थानिक बातम्या

नायलॉन मांजामुळे नागरिकांसह पक्षांच्या जिवावर ‘संक्रांत’

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । पतंगबाजी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांज्याच वापरला जात असल्याचे जणू सूत्रच बनले आहे. मात्र हाच नायलॉन मांजा नागरिकांसह पक्षांच्या जिवावर संक्रांत आणणारा ठरतोय. त्यामुळे बर्‍याच जणांना गंभीर इजा झाली असून अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्याचा वापर टाळून होळी करण्याची वेळ आली आहे. बाजारात घातक मांज्यापेक्षा दुसर्‍या साध्या मांज्याचाही पर्याय उपलब्ध झालाय.

मकर संक्रांत अर्थात ‘पतंगोत्सव’ साजरा करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. पूर्वीप्रमाणेच आजही आपण ती जपली आहे. कालपरत्वे या पद्धतीत थोडा बदल झाला असून पतंगाचे स्वरूप, मांजादेखील बदलला आहे. पतंंगबाजीसाठी दुसर्‍याची पतंग काटण्याची जी स्पर्धा सुरू होते, ती अनेकदा जीवघेणी ठरते. त्यातच भर म्हणून घातक अशा नायलॉन व काचेचा मांजा वापरला जातो. याच माज्यामुळे नागरिकांवर संक्रांत कोसळत असल्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळाले आहेत. दुचाकीस्वार तरूण, तरूणी, महिला डॉक्टरांचे गळे कापले गेल्याने त्यांचा नाहक बळी गेल्याच्या मनाला सुन्न करणार्‍या घटनाही आपल्याकडे घडल्या आहेत.

त्यामुळे घातक अशा नायलॉन मांजाचा पतंग उडविण्यासाठी वापर न करता, त्याची जेथे विक्री होत आहे, त्या ठिकाणाची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यास नक्कीच नागरिकांसह पशु पक्षांवर कोसळणारी संक्रांत थांबून अनेकांचे जीव वाचण्ंयास मदत होऊ शकते. नायलॉनच्या दुष्परिणामामुळे त्याच्या वापरावर आणि उत्पादनावर राज्यात व जिल्ह्यात प्रशासनाने बंदी घातली. मात्र तरीही चोरी छुप्या पद्धतीने त्याची चढ्या भावाने विक्री केली जाते. पोलीस कारवाईचे सोपस्कार करत असले तरीही पतंगबाजीला हमखास हा मांजा वापरलाच जातो.

‘देशदूत’चे आवाहन
दुचाकीस्वारांच्या आणि पशूपक्षांच्या अस्तित्वावर टाच आणणार्‍या नायलॉन मांज्याचा वापर पूर्णत: टाळावा, तसेच जे कुणी वापरत असतील तर त्यांना परावृत्त करा, असे आवाहन ‘देशदूत’ करीत आहे.

तरूणाईला नायलॉनचे वेड
आजच्या तरूणाईला पतंगोत्सवात साधा मांजा वापरलेला रूचत नाही. त्यांची पसंती फक्त आणि फक्त नायलॉन मांंज्यालाच असते. नागरीकांसह पक्षांच्या जिवीतास कारणीभूत ठरणार्‍या या मांज्याचा वापर कटाक्षाने टाळून त्याची होळी करणे ही आत्ताच्या घडीची गरज आहे, तरच पशुपक्षी आणि नागरिकाचां होणारा घात टाळण्ंयास मदत होईल.

गुन्हे दाखल करणार
शहर पोलीसासह ग्रमिण पोलिसांनी गेल्या वर्षी नायलॉन मांज्याची विक्री करणार्‍या दुकानदारांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले होते. तसेच लाखोे रुपयांच्या मांज्याचे गट्टू जप्त केले होते. यावर्षी सुद्धा मांज्याची विक्री व वापरावर बंदी आहे. जो कुणी त्याची विक्री वा वापर करेल, त्याच्यावर पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com