दिंडोरी तालुक्यातील करोना बाधितांची संख्या चारवर

दिंडोरी तालुक्यातील करोना बाधितांची संख्या चारवर

दिंडोरी : तालुक्यात इतरही भागात करोना पाय पसरत असून आता निळवंडी गावातही पोहोचल्याने दिंडोरीकरांची धाकधुक वाढली आहे.

निळवंडी येथील ४० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून गावातील सर्व रस्ते सील करण्यात आले आहेे. प्रशासकीय यंत्रणा पुर्ण तयारीनिशी कामाला लागली आहे.

काही दिवसांपुर्वी सदर व्यक्तीवर किरकोळ आजारावर शस्त्रक्रिया झाल्याची चर्चा आहे. परंतु त्याला कीरकोळ त्रास जाणवू लागल्याने तो नाशिक येथे गेला. तेथे करोनाची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शासनाकडून याबाबत अहवाल कळताच निळवंडी गावात सर्व शेतकर्‍यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

शासनानेही युध्द पातळीवर उपाययोजना सुरु केली आहे. निळवंडी गावाच्या रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. संबंधित व्यक्तीचा दिंडोरी, निळवंडी कुणाकुणाशी संपर्क आला याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

सायंकाळी पोलिस, महसुल, आरोेग्य यंत्रणेने प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु केली आहे. इंदोरे येथे क्वॉरंटाईन केलेल्या दोन व्यक्तीचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहे.  त्यामुळे दिवसभरात रुग्ण संख्या तीन झाली असून तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या चार झाली आहे.

निळवंडी गावातील संबंधितांचे घरापासून एक किमीचा परिसर कंटेंटमेंट विभाग घोषित करण्यात आला आहे. दोन किमी परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. दिंडोरी शहरात, बाजारात आणि मद्यविक्री दुकानावर जास्त गर्दी होत असल्याने येथुन संसर्गाचा धोका जास्त होवू शकतो, म्हणून दिंडोरी शहरात लॉकडाऊनचे नियम कडक करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com