आता शयन-आसन बसमधून करा ‘आवडेल तेथे प्रवास’
स्थानिक बातम्या

आता शयन-आसन बसमधून करा ‘आवडेल तेथे प्रवास’

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक |  शिवशाही आणि शिवनेरी पासधारकांना दिलासा देणारा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेंतर्गत काढण्यात आलेला पास आता महामंडळाच्या विनावातानुकूलित शयन-आसन बसमध्येदेखील ग्राह्य धरण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यामुळे हजारो पासधारकांना प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेंतर्गत शिवशाही आणि शिवनेरीसाठी 7 आणि 4 दिवसांचे पास प्रवाशांना देण्यात आले आहेत. मात्र विनावातानुकूलित शयन-आसन बसमधील वाहकांकडून, ‘हा पास या बसमध्ये ग्राह्य नाही’ असे सांगण्यात येत होते. पास वैध नसल्यामुळे पासधारकांना अतिरिक्त पैसे देऊन तिकीट काढावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. अनेकदा पैशांअभावी थेट प्रवासच नाकारल्याच्या घटनादेखील घडल्या.

अशा अनेक प्रवाशांच्या तक्रारी महामंडळात दाखल झाल्या होत्या. यामुळे ऐन गर्दीच्या हंगामात महामंडळासाठी ही नवी डोकेदुखी ठरत होती. शिवशाही व शिवनेरी बससेवेच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेच्या पासधारकास विनावातानुकूलित शयन-आसनी बसमधून प्रवास करू देण्याचे लेखी आदेश महामंडळाच्या वाहतूक शाखेने दिले आहे.

तसेच विनावातानुकूलित शयन-आसन बसमधील कर्मचार्‍यांना लेखी आदेश देऊन त्यांची नोंदवहीत स्वाक्षरी घ्यावी, असे ही वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. या योजनेतील पास शहरी वाहतुकीसदेखील वैध आहे.

या योजनेंतर्गत 2018-19 या आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 8 हजार 636 पासची विक्री झाली. यातून 2240.14 लाख इतके उत्पन्न महामंडळाला मिळाले होते, अशी माहिती एसटी अधिकार्‍यांनी दिली. एसटी महामंडळात 1988पासून ’आवडेल तेथे प्रवास’ ही योजना सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com