पेठ : सोशल डिस्टन्सींगचा भंग प्रकरणात सोनोग्राफी सेंन्टरला नोटीस
स्थानिक बातम्या

पेठ : सोशल डिस्टन्सींगचा भंग प्रकरणात सोनोग्राफी सेंन्टरला नोटीस

Gokul Pawar

पेठ : करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सींग पाळणे अत्यंत आवश्यक असतांना शहरातील साई किरण सोनोग्राफी सेंटरमध्ये सत्तर ते ऐंशी गरोदर मातांना तपासणीसाठी बोलावल्याने सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडाला आहे.

दरम्यान करोना व्हायरसला अटकाव करणयासाठी शासनाकडून काही नियम लावण्यात आले आहेत. परंतु येथील साई सेंटर मध्ये तपासणी साठी ७० ते ८० मातांना अक्षरशः दाटीवाटीने बसवुन तपासणी केंद्र चालविण्यात येत होते. नियमांचा भंग केल्या प्रकरणी सोनोग्राफी केंद्राचा संचालिका डॉ. रोहिणी सानेवणे यांना ग्रामिण रूग्णालयाचे अधिक्षक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनीही याबाबतची नोटीस बजावलेली असल्याने सोनोग्राफी सेन्टर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे .

पेठ शहरातील बाजारपेठेत पतसंस्थेच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर सोनोग्राफी केंद्र गेली दोन वर्षापासुन सुरु आहे. तालुक्यात व ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा नसल्याने शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून गर्भवतीची सोनोग्राफीसाठी संबधीतांकडून पत्र देण्यात येते. नागरीकांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही शासनाकडून अनुदान देण्यात येते.

प्रत्येक दिवशी ठराविक सोनोग्राफी करणे बंधनकारक असताना नियम झुगारून केवळ अठवड्यातून एकच दिवशी येऊन सोनोग्राफी करण्यात येत असल्याने केंद्रात तोबा गर्दी होते. दि.२२ ( बुधवार ) रोजी अशीच तोबा गर्दी होऊन सोशल डिस्टन्सींगचा पुर्णपणे फज्जा उडालेला असल्याचा प्रकार निर्दशनास आला. यावेळी तहसिलदार, मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आदींनी भेट देऊन केंद्र संचालकांना धारेवर धरले.

Deshdoot
www.deshdoot.com