राज्यातील एकही शेतकरी बियाणे व खतांपासून वंचित राहणार नाही : कृषी मंत्री दादाजी भुसे
स्थानिक बातम्या

राज्यातील एकही शेतकरी बियाणे व खतांपासून वंचित राहणार नाही : कृषी मंत्री दादाजी भुसे

Gokul Pawar

मालेगाव : कृषी विभागामार्फत मुबलक प्रमाणात बियाणे व खतांच्या बफर स्टॉकचे वितरण कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बांधावर वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; त्यामुळे राज्यातील एकही शेतकरी बियाणे व खतांपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन  राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज  केले.

तालुक्यातील दाभाडी येथे मा.श्यामप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेच्या कार्यारंभ आदेशाचे वाटप करण्यात आले,त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, सरपंच श्रीमती चारुशिला निकम, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उपसंचालक श्री.माळी, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, अशोक निकम, दिलीप निकम, शिवाजी हिरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, कोरोनासारख्या महामारीसोबतच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांसमोर एकापाठोपाठ एक संकट उभे ठाकत आहे. अशा संकटांचा सामना करण्यासाठी शासन सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आलेल्या प्रत्येक संकटाला परतवून लावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे आज म्हणाले.

खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोहचविण्याची संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  संपूर्ण राज्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्यावर कृषी विभागामार्फत आवश्यक उपाययोजना आखण्यात येत आहेत. सामुहिक शेततळे, कांदाचाळ, पॅक हाऊस, शेडनेटसारख्या योजना राबवून शेतकऱ्यांसाठी ठिबक व फळबागाच्या अनुषंगाने दिलासा देण्याचे काम शासनामार्फत सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मा.श्यामप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन योजनेची  विस्तृत स्वरुपात माहिती देतांना उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे म्हणाले, सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून तालुक्यातील प्रत्येक गावात या क्लस्टरच्या माध्यमातून संपुर्ण तालुक्याचा विकास साधण्यात येईल. महिला बचत गटांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांचा या कार्यक्रमात अंतर्भाव करण्यात येणार असून क्रिडांगणे, आदिवासी संकुल व चांगली शौचालये उभारण्याचे प्रयोजन देखील या योजनेतून साकारण्यात येणार आहे.

*कृषी मंत्र्यांनी केले वृक्षारोपण*

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील दाभाडी येथे आज कृषीमंत्री ना.भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  तसेच गेल्यावर्षी देखील सुमारे ११०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील मोठ्या प्रमाणातील संगोपन करण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करतांना मनस्वी आनंद होत असून माणुसकी फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचे चांगले काम झाले असून याचा आदर्श संपुर्ण तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही कृषीमंत्री मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

Deshdoot
www.deshdoot.com