मनपाचे जाकीर हुसेन हॉस्पिटल कोरोना बाधितांसाठी राखीव : पालकमंत्री छगन भुजबळ
स्थानिक बातम्या

मनपाचे जाकीर हुसेन हॉस्पिटल कोरोना बाधितांसाठी राखीव : पालकमंत्री छगन भुजबळ

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी नाशिक मनपाचे जाकीर हुसेन हॉस्पिटल पूर्णत: राखीव ठेवण्यात येत असुन यात केवळ कोरोना बाधीतांना सेवा सुश्रृषा देण्यात येतील. तसेच खबरदारीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून नाशिक जिल्ह्याच्या सर्व सिमा 25 मार्च 2020 च्या सकाळपासून सिल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांनी पत्रकारांना दिली.

आज कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विविध शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीनंतर उपस्थित पत्रकारांशी पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, वासंती माळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षक डॉ.मनोहर अनचुडे हे उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीचे मुद्दे

▪ राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू.
▪ सर्व प्रकारच्या कायदेशीर कारवाईला सर्व यंत्रणांना मुभा देण्यात येत आहे. परंतु या कारवाईला मानवी चेहरा असावा.
▪ अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही वाहने अन्य कामांसाठी फिरणार नाहीत.
▪ ऑटो रिक्षामध्ये 1 वाहनचालक + 1 प्रवासी = 2 इतक्या लोकांना प्रवास करता येणार.
▪ फिरत्या वाहनांमधून अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीला प्राधान्य देणार.
▪ जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या 500 क्वारंटाइन रुग्ण
▪ कुठल्याही प्रकारच्या मांस विक्रीवर बंदी घातलेली नाही.
▪ बचतगटाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे कापडी मास्क बनविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरु आहे.
▪ घरी राहुन काम करण्यावर भर देण्यात यावा.
▪ स्वयंस्फुर्तीने बंद पाळणाऱ्यांचे स्वागत.

Deshdoot
www.deshdoot.com