सत्कार सोहळे अन विवाह सोहळ्यात मग्न जि. प. पदाधिकारी; भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचा आरोप
स्थानिक बातम्या

सत्कार सोहळे अन विवाह सोहळ्यात मग्न जि. प. पदाधिकारी; भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचा आरोप

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला विविध लेखाशीर्षकाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी वेळेवेळी प्राप्त झालेला आहे.मात्र,केवळ पदाधिकार्‍यांच्या नियोजनाअभावी हा निधी अखर्चित राहीला आहे.यासंदर्भात दस्तुरखुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.निधी खर्चासाठी त्यांंनी दोन वेळा बैठक घेत अखर्चित निधीचा मुद्दा उपस्थित केला.एकिकडे असे असताना जिल्हा परिषद विद्यमान पदाधिकार्‍यांंना मात्र याविषयी काहीच घेणे देणे नसून याचे गांभीर्य नाही असा,आरोप भाजपचे गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी केला आहे.

अध्यक्ष,उपाध्यक्षांसह सभापतींची निवड जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली.मात्र,नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांपैकी कोणालाच अजूनही कामाचा सूर सापडलेला नाही.जानेवारी महिना पूर्णत: पदाधिकार्‍यांची दालने सुधारण्यातच गेला.उपाध्यक्षांचे दालन सुधारण्याचे काम अजूनही सुरुच आहे.शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांनी आढावा बैठक घेतली. मात्र,कामकाजाला अजून सुरुवात केलेली नाही.अशीच परिस्थिती महिला व बालकल्याण समितीचीही असून सभापती अश्विनी आहेर यांनी केवळ आढावा बैठक घेत अधिकार्‍यांना सुनावले असले तरी सभापतींना स्वत: कार्यालयात उपस्थित राहण्यास अजूनही वेळे नसल्याचा आरोप डॉ.कुंभार्डे यांनी केला आहे.

निधी खर्चाची पूर्णत:जबाबदारी असणार्‍या उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती डॉ.सयाजी गायकवाड यांना तर अजुनही कामाची पध्दत अवगत झालेली दिसत नाही.परिणामी कोट्यवधींचा निधी दोन महिन्यांत खर्च कसा करणार?असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.उपाध्यक्ष तर केवळ लग्न सोहळ्यांमध्येच व्यस्त असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या कामाशी देणेघेणेच नसल्यासारखी स्तिती असल्याचा आरोपही त्यांनी केला. महत्वाच्या दिवशी जिल्हा परिषदेत उपस्थित राहण्याचे सोडून वैयक्तिक कार्यक्रमांना ते हजेरी लावत असल्यामुळे अखर्चित निधीचे संकट अधिक गडद होत चालले आहे.

याची खबरदारी डॉ.गायकवाड यांनी वेळीच घ्यावी. अन्यथा,निधी परत गेल्यास जिल्ह्याचे मोठे नुकसान होईल,असेही त्यांनी सांगिअतले.अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व कृषी सभापती संजय बनकर हे जिल्हा परिषदेत पूर्णवेळ उपस्थित राहत असले तरी त्यांच्या कामाचा प्रभाव पडलेला दिसत नाही.आर्थिक भार कमी असलेल्या कृषी समितीचे कामकाज सध्या समाधानकारक दिसून येत आहे.उर्वरीत सभापतींना कामाचा आवाका अद्याप लक्षात न आल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांचे मोठे नुकसान होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

शासनाकडून प्राप्प्त झालेल्या कोट्यवधीचा निधी मार्च अखेर खर्च करण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांसमोर आहे.यासाठी कामाचे योग्य वेळी नियोजन करुन जास्तीत जास्त निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र,तसे प्रयत्न होताना दिसत नाही.पदाधिकार्‍यांनी लग्न सोहळे व सत्कार समारंभात गुंतून पडण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

– डॉ.आत्माराम कुंभार्डे, गटनेते, भाजप

Deshdoot
www.deshdoot.com