भाजप जिल्हाध्यक्षपदी केदा आहेर
स्थानिक बातम्या

भाजप जिल्हाध्यक्षपदी केदा आहेर

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी
महाविकास आघाडी शासनाला टक्कर देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून याचाच भाग म्हणून तरूण, आक्रमक व नव्या चेहर्‍याला संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपमध्ये जुना व नवा वाद उफाळलेला असताना पक्षाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली आहे.
भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत वाणी व सहनिवडणूक अधिकारी नंदकुमार खैरणार यांनी ही घोषणा केली. विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, प्रदेश भाजपचे आदेश प्राप्त झाल्यानंतर शहर भाजपने शहराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केली. जिल्हाध्यक्षपद निवडणुकांमध्ये अंतर्गत वाद व इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे तालुकाध्यक्षांची निवडणुका रखडल्या होत्या. अखेर पक्षाने लक्ष घालीत वाद मिटविल्यानंतर, सर्व तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रीया गेल्या आठवड्यात पार पडली. ही प्रक्रीया झाल्यानंतर, जिल्ह्यातील सर्व जिल्हापदाधिकारी, नवनिर्वाचीत मंडळाध्यक्ष व कार्यकर्ता यांची एकत्रित बैठक जिल्हाध्यक्षनिवडीसाठी झाली.
सोमवारी (दि.27) चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील रेणुका इव्हेंट हॉलमध्ये उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत वाणी, सहनिवडणूक अधिकारी नंदकुमार खैरणार, खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. जिल्हाध्यक्षपदासाठी फारसे इच्छूक नसल्याची चर्चा असताना या पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, बापू पाटील, सतीश मोरे, विलास ढोमसे, कैलास सोनवणे, चंद्रकांत राजे, केदा आहेर यांसह तब्बल 10 इच्छूकांनी तयारी दाखविली. त्यानंतर निवडणूक अधिकार्‍यांनी माघारीचे आवाहन केले असता, 10 इच्छुकांनी माघार घेतली. या माघारीनंतर इच्छुकांची मनधरणी करून 7 इच्छुकांची माघारी झाली. या माघारी नाट्यानंतर, संघटनमंत्री काळकर, जिल्हा निवडणूक अधिकारी वाणी यांनी आहेर यांची बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
बैठकीस माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण, चांदवड-देवळा मतदार संघाचे आ. डॉ. राहूल आहेर, माजी. जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, जिल्हा परिषद गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मनीषा पवार, मालेगाव जिल्हाध्यक्ष सुरेश निकम आदी उपस्थित होते.
माघारीसाठी पक्षाची दमछाक 
भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छूकांची संख्या वाढल्याने बैठकीत माघारीनाट्य रंगल्याचे बघावयास मिळाले. तब्बल 18 इच्छूकांची माघार करतांना पक्षाची दमछाक झाली. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे बैठक तीन तास उशीराने सुरू करावी लागली. यानंतर इच्छुक आडून बसल्याने दीड तास त्यांची समजूत काढण्यात गेली. त्यानंतर ही निवड बिनविरोध झाली. आहेर यांच्या निवडीनंतर पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीनाटयही रंगल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
आक्रमक चेहर्‍यांस संधी
केदा आहेर यांनी यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद भूषवलेले असून जिल्हा परिषदेत संख्याबळ कमी असताना देखील 2014 मध्ये भाजपला सत्तेत बसविण्याची कामगिरी करत आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली होती. त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद व देवळा बाजार समितीचे सभापती म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बँक चालविताना सर्वांना सोबत घेण्याचे कौशल्य लक्षात घेऊन अन एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे. सरपंचपदापासून सहकार, राजकीय अनुभव गाठीशी असल्याने त्यांच्या कार्यकाळात नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूतपणे उभे राहील या दृष्टिकोनातून पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षपद बहाल केल्याची चर्चा पक्षातंर्गत आहे.
पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्याचा मानसन्मान करून पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर राहणार आहे. आगामी नगरपंचायती, नगरपालिका व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला सत्तेत आणण्यासाठी काम करणार आहे. तरूण, महिला वर्ग पक्षाशी जोडून एक उत्तम प्रकारचे पक्ष संघटन करून जिल्ह्याचा नावलौकिक होईल असे काम काम करण्याचा संकल्प आहे.
– केदा आहेर (नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष, भाजप)
Deshdoot
www.deshdoot.com