नाशिक : होम क्वारंटाइन पुन्हा ताब्यात : जिल्हाधिकारी
स्थानिक बातम्या

नाशिक : होम क्वारंटाइन पुन्हा ताब्यात : जिल्हाधिकारी

Gaurav Pardeshi

नाशिक :

ऑस्ट्रेलिया येथून नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात राहणारे होम क्वारंटाइन असलेले एक कुटूंबिय भारतात आले आहे. व सदर कुटूंबिय फरार झाल्याची बातमी आज वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आली होती. तथापि, या कुटुंबास तातडीने ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

पाथर्डी फाटा परिसरात राहणारे एक कुटूंबिय 11 मार्च 2020 रोजी ऑस्ट्रेलिया येथून भारतात आले आहे. सदर कुटूंबिय काही दिवस पाथर्डी फाटा परिसरात राहिल्यानंतर त्यांचे नातेवाईक असलेल्या इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे कुटूंबासह 17 मार्च 2020 रोजी आले. ही बाब इगतपुरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख मोहम्मद तुराबअली यांना कळाल्यानंतर त्यांनी 18 मार्च 2020 रोजी आपल्या टिमसह त्यांना होम क्वारंटाइन म्हणून राहण्यास व घराच्या बाहेर इतरत्र न राहण्याच्या व फिरण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर सदर कुटूंबिय त्यांचे मुळ घर हे पाथर्डी फाटा येथे असल्यामुळे 18 मार्च 2020 रोजी दुपारी पुन्हा नाशिक शहरात आले. त्यानंतर 19 मार्च रोजी खंबाळे येथे पुन्हा कुटूंबियासमवेत आले, ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने 108 ॲम्ब्युलन्स व पोलीस यंत्रणे मार्फत विलगीकरणासाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा झालेली नसुन ते संशयीत म्हणून होम क्वारंटाइन असुन आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात व देखरेखीखाली आहेत.

होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आलेले कोणतेही नागरिक जर यापुढे बाहेर दिसले तर त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. असे नागरिक अन्य नागरिकांमध्ये मिसळत असताना दिसून आल्यास त्याबाबतची माहिती तातडीने हेल्पलाईन 104 अथवा 100 या क्रमांकावर नागरिकांनी द्यावी, असेही आवाहन यानिमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com