PhotoGallery : सिन्नर तालुक्याला निसर्गाचा तडाखा; २१.२० मिमी पावसाची नोंद
स्थानिक बातम्या

PhotoGallery : सिन्नर तालुक्याला निसर्गाचा तडाखा; २१.२० मिमी पावसाची नोंद

Gokul Pawar

नाशिक : करोनाच्या संकटाला सामोरे जात असतांनाच बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीस तडाखा दिल्यानंतर जिल्ह्यातही मोठे नुकसान केले. सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून विजेचे पोल देखील कोसळले आहे.

दरम्यान बुधवारी सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यासह अनेक तालुक्यात बसला असून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने सिन्नर तालुक्याला झोडपून काढले.

तालुक्यात २१.२०मिमी पावसाची नोंद

बुधवारी चक्रीवादळामुळे तालुक्यात सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. पर्जन्यमान मोजण्यासाठी सात मंडळ स्तरावर पर्जन्यमापक यंत्र असून त्या नोंदीनुसार सिन्नर मंडळात १११ मिमी, पांढुर्ली ७६.५० मिमी, नांदुरशिंगोटे ४३ मिमी, शहा ३१ मिमी, डुबेरे ४५ मिमी, वावी ३१ मिमी तर देवपूर २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ताशी ३० किलोमीटर वेगाने तालुक्यात वारे वाहत असल्याने पश्चिम भागात शेती व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांचे व गोठयांचे पत्रे उडाले असून शेडनेट, पॉलिहाऊस चे नुकसान झाले आहे. सुदैवाने तालुक्यात कुठेही जीवित हानी झाली नसल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशाने आज सकाळपासून नुकसान झालेल्या भागात तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यामार्फत पंचनामे करण्यात येत होते.

१४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

तालुक्यात बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे सुमारे १३८.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात भाजीपाला, फळ पिकांसोबतच हंगामी पिकांचा समावेश आहे. वडगाव पिंगळा येथे एक जनावर दगावल्याची नोंद महसूल प्रशासनाने घेतली असून तालुक्यात १५ कच्ची घरे तर १६ पक्की घरे वादळाच्या तडाख्यात सापडली आहेत. या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. वादळ कुणीही व्यक्ती जखमी अथवा मृत झालेली नाही. प्रशासकीय पातळीवरून दुपारपर्यंत नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम आटोपले होते.

घरांमध्ये गुडघाभर पाणी

वावी परिसरात असणाऱ्या तीन घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. या भागात गावातील पाणी एकत्र येत असल्याने व बसस्थानकातील कामादरम्यान भर टाकण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. परिणामी तेथे राहणाऱ्या तीन कुटुंबाच्या घरामध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचले होते. घरामध्ये पाणी साचल्यामुळे वादळाची पर्वा न करता या कुटुंबातील सदस्यांनी टिकाव, फावडे घेऊन बस स्थानकाच्या बाजूने पाणी बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील पहाटेपर्यंत काही प्रमाणात पाणी तसेच होते. तर घरांमध्ये पूर्ण ओल आली होती. कमलाकर पाथरे, एकनाथ पवार यांच्या घरांमध्ये हे पाणी घुसल्याने या कुटुंबांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.

दरम्यान या वादळात शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणाचे करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामाचा ठेका घेतलेल्या मोंटोकार्लो कंपनीने पिंपरवाडी शिवारात वसाहत थाटली आहे. या वसाहतीभोवतीचे पत्र्याचे कंपाऊंड वादळात आडवे झाले. जनरेटर हाऊसचे पत्र्याचे शेड देखील जमीनदोस्त झाले. कॅंटीनच्या काही भागातील पत्रे उडून नुकसान झाले आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

वादळानंतर अनेक ठिकाणी वीजवाहक तारांवर झाडे पडल्याने व खांब वाकल्याने ग्रामीण भाग रात्रभर अंधारात होता. शहरी भागात देखील काहीअंशी वीजपुरवठा खंडित होता. आज सकाळपासूनच युद्धपातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.

महावितरणच्या उपविभाग १ अंतर्गत सिन्नर शहर, माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहती, वडांगळी पर्यंत वीज पुरवठा केला जातो. कालच्या वादळात या उपविभागातील ४० ते ५० ठिकाणी खांब पडले होते. अनेक ठिकाणी वीज वाहक तारांवर झाडे, फांद्या पडल्याने नुकसान झाले होते. परिणामी रात्री बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.

माळेगाव येथील केंद्रात मध्यरात्रीच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. मात्र, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन तास प्रयत्न करत हा बिघाड दूर केला. ट्रान्सफॉर्मर पासून निघालेल्या वितरण वाहिन्यांवर सर्वाधिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले.

तर उपविभाग २ अंतर्गत देखील जवळपास ८० ठिकाणी थांब पडल्याचे समजते. या विभागातील १० विजकेंद्रे रात्रभर अंधारात होती. सकाळपासूनच बिघाड दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली. सुमारे १२० अधिकारी व कर्मचारी यासाठी झटत होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्वच भागात वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com