नाशिककरांना पुन्हा महिनाभर ‘स्मार्ट’ रस्त्याचा त्रास
स्थानिक बातम्या

नाशिककरांना पुन्हा महिनाभर ‘स्मार्ट’ रस्त्याचा त्रास

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । नाशिककरांना डोकेदुखी ठरलेला स्मार्ट पायलट रोडचे लांबलेले काम जाहीर केल्यानुसार २६ जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण झालेले नसल्याने नागरिक व व्यापार्‍यांच्या संतापात भर पडली आहे. वाहतुकीसाठी खुला केल्याचे जाहीर करणार्‍या स्मार्ट सिटी कंपनीकडून आता शिल्लक कामांसाठी अजून महिना भराचा कालावधी लागणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने नाशिककरांना अजून एक महिना रस्त्यांच्या कामाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान या रस्त्याची खराब रायडिग क्वालिटी तपासण्याचे काम आयआयटीकडून करण्याचा निर्णय आज कंपनी चेअरमन सीताराम कुंटे यांनी जाहीर केला.

स्मार्ट सिटी कंपनीकडून-अशोकस्तंभ ते त्र्ंंयंबक नाका सिग्नल या एक कि. मी. च्या रस्त्याला स्मार्ट पायलट रोडचे रुप देण्यासाठी १६.१५ कोटी खर्चास मान्यता देऊन याचे काम १६ एप्रिल २०१८ रोजी सुरू करण्यात आले होते. सहा महिने मुदतीचे काम अद्यापही संपलेले नाही. शिवाय कंपनीकडुन या ठेकेदारास मुदत वाढ दिल्यानतंर पुन्हा सुधारित प्राकलन तयार करुन नवीन 3.89 कोटी रुपयांच्या खर्चास वाढीव मंजुरी देऊन हा प्रकल्प 20 कोटींपर्यत नेवून ठेवला. या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, याभागातील शाळा, शासकिय कार्यालये, व्यापारी व नागरिकांना ंवेठीस धरण्याचे काम झाले. यामुळे संतप्त प्रक्रिया उमटल्या जाऊन नागरिक व व्यापार्‍यांनी आंदोलन करीत याकडे लक्ष वेधले. ठेकेदारास दंड ठोठावला जात असतानाही हे काम अद्यापही पुर्ण झालेले नाही.

अंतिम टप्प्या अशोकस्तंभ चौकाच्या कामांमुळे संपूर्ण वाहतूक वळविण्यात आल्याने याचा मोठा फटका व्यापार्‍यांना बसला.या नाशिककरांच्या संतापात भर घालणार्‍या व वादग्रस्त ठरलेल्या या स्मार्ट पायलट रोड २६ जानेवारी २०२० रोजी सुरू होईल असे जाहीर करण्यात आल्यानंतर देखील अद्यापही रस्ताचे काम संपलेले नाही. अजुनही एका बाजूची वाहतूक बंद असून अशोकस्तंभापासून घारपुरे घाटाकडे जाणारा रस्ता सुरू झालेला नाही. तसेच याठिकाणी हायमास्ट दिवे, बस स्टॅण्ड, इ टॉयलेट, अंडर ग्राऊंड विद्युत केबल, सिग्नल यंत्रणा, सोलर पॅनल आदीसह काही कामे अद्यापही झालेले नाही.

या रस्त्याचे प्राकलन तयार करणारी कंपनी, ठेकेदार कंपनी व स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक अशा स्मार्ट पायलट रोडची रायडिंग क्वालिटी खराब झाली आहे. याठिकाणी वाहनातून जातांना हेलकावे बसत असल्याचे जाणवते. अशाप्रकारे स्मार्ट रस्त्याला आवश्यक असलेले पॅरेमीटर नसल्याची कबुली कंपनीच्या चेअरमन यांनी पूर्वीच दिली असून रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे जाहीर केले आहे. अशाप्रकारे स्मार्ट सिटी म्हणुन राबविला जाणारा पहिला प्रकल्प म्हणून पाहिल्या गेलेल्या स्मार्ट पायलट रोडचा त्रास आता पुन्हा एक महिना सोसावा लागणार असल्याने नागरिकांत संताप व्ंयक्त केला जात आहे.

दरम्यान आज स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक चेअरमन सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देतांना कुंटे यांना स्मार्ट पालयट रोडसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी कंपनी सीईओ प्रकाश थविल यांना उत्तरे देण्यास सांगितले. यावेळी वाहतुकीसाठी स्मार्ट रोड खुला केल्याचे थविल यांनी सांगतांनाच शिल्लक असलेल्या कामांची यादीही सांगत या शिल्लक कामांसाठी एक महिना लागणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच रेंगाळलेल्या काम आणि वाढलेली किंमत यास जबाबदार असलेल्या सल्लागार कंपनी आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकार्‍यांवर जबाबदारी टाकून कारवाई करणार का ? या प्रश्नांला कुंटे यांनी उत्तरे दिली. त्यांनी या कामात अनियमितता झाली नसल्याचे सांगितले. मात्र कुंटे यांनी रस्त्यांची रायडिंग क्वालिटीची तपासणी ही आयआयटीकडून करुन या कामात दुरुस्ती केली जाणार असल्याचेही सांगितले. मात्र याचा खर्च कोणाकडून वसूल करणार? याचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

Deshdoot
www.deshdoot.com