नागलीच्या पापडाची चव सातासमुद्रापार; दोन महिलांची यशोगाथा
स्थानिक बातम्या

नागलीच्या पापडाची चव सातासमुद्रापार; दोन महिलांची यशोगाथा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर असून केवळ ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना मोडित काढून संसाराचा गाडा चालवत असतात. गृह उद्योगाला प्राधान्य देताना नेमका कोणता व्यवसाय करावा, जेणेकरून प्रपंच सुरळीत चालेल व गरिबी दूर होईल, असा विचार वडनेर पंपिंगरोडवरील पोरजे मळा येथील मनिषा संजय पोरजे व योगिता विजय पोरजे या दोघा जावांनी केला. विचार कृतीत उतरवून त्यांनी पापड व्यवसाय निवडला. या व्यवसायातून त्यांचा संसार थाटात फुलला.

आज हा पापड भारतातच नाही तर विदेशात ‘इंडियन स्टार्टर’ म्हणून भाव खाऊ लागला आहे. प्रत्येक भारतीय घरात पापडाचा डबा आजही अढळस्थान पटकावून आहे. योगिता व मनिषा पोरजे यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेला व्यवसायाने आज मोठे स्वरूप धारण केले असून त्यांच्या पापडाला मागणी वाढत आहे. शेतीत जास्त उत्पन्न मिळत नसल्याने योगिता व मनिषाने शेतीला जोडधंदा म्हणून नागली पापड तयार करण्याचे ठरवले. सुरुवातीला दिवसाला शंभर पापड विक्री होऊ लागली. हळूहळू पापडाला मागणी वाढल्याने त्यांनी पापडाची मशीन विकत घेऊन मोठा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. आता दिवसाला दररोज 30 ते 40 किलो पापड विक्री होत असल्याचे त्या सांगतात.

नागलीची पोते विकत आणून मशिनमध्ये त्याचे दळण करून त्यानंतर पापड तयार करतात. सकाळी 9 वाजता पापड तयार करण्याच्या कामास त्या सुरुवात करतात. दुपारी 2 वाजेपर्यंत हजारो पापड तयार करतात. एका किलोत 100च्या वर पापड तयार होत आल्याचे ते सांगतात. त्यांच्यामुळे बेरोजगार महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यांचे पापड विक्रेते घेऊन महाराष्ट्रसह देश-विदेशात विक्री करत असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या अस्सल पापडाची चव सातासमुद्रापार खवय्ये चाखत आहे.

काहीतरी उद्योग करावा असा विचार आमच्या दोघींच्या मनात घोळत होता. आम्ही हा विचार घरच्यांना शेअर केला. त्यांच्या होकाराने नवऊर्जा मिळाली व पापड व्यवसाय सुरू केला. आज आमचा पापड विदेशात विक्रीसाठी जातो. विदेशातील लोक या पापडाची रुचकर टेस्ट चाखत असल्यामुळे याचा आम्हाला अभिमान वाटतो. महिलांनी मोबाईल, सिरीयल, शेजारणीशी गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा गृहोद्योग सुरू करून संसाराची चाके सुरळीत करता येतात.
-मनिषा व योगिता पोरजे

Deshdoot
www.deshdoot.com