गिरणारे : माहिती न दिल्यानेच धोंडेगावच्या शेतकर्‍याचा खून; चौघांना अटक

गिरणारे : माहिती न दिल्यानेच धोंडेगावच्या शेतकर्‍याचा खून; चौघांना अटक

नाशिक : गावातील व्यक्तीचा पत्ता न दिल्याच्या किरकोळ कारणातून हरसुल जवळील धोंडेगाव येथील शेतकर्‍याचा चौघांनी खून केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी ग्रामिण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने नाशिक शहरातील मखमलाबाद व उमराळे (ता. दिंडोरी) येथील सावकरासह चौघांना अटक केले आहे.

हिरामाण काशिनाथ धात्रक (४३, धोतरआहोळ, उमराळे, ता दिंडोरी), गणेश दत्तात्रय मानकर (४३, मखमलाबाद, नाशिक), रामनाथ बबन शिंदे (३३, आडगाव, हल्ली उमराळे बुद्रुक) व विकास शिवाजी धात्रक (३०, रा. उमराळे ता. दिंडोरी) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

११ मे रोजी रात्री हरसुल पोलीस ठाणे हद्दीतील धोंडेगाव ता. नशिक येथील शेतकरी मोतीराम वामन बेंडकोळी (५५) यांचा अज्ञात व्यक्तींनी मांडीवर तसेच पोटावर चाकूने वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता.

पथकाने धोंडेगाव शिवारातील संजीवनी हार्ट केअर ऍण्ड रिसर्च सेंटरच्या प्रवेशद्वारावरील सीसीटिव्ह कॅमेरा तपासला असता त्यामध्ये पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आढळून आली. या कारचा शोध पथकाने सुरू केला होता. दरम्यान या वर्णनाची कार उमराळे येथील एका शिवारात उभी असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीसांनी कारमालक संशयित हिरामण कारभारी धात्रक यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने इतर तीन साथीदारांची माहिती देताच त्यांना मखमलाबाद व परिसरातून अटक केली. त्यांनी शेतकर्‍याचा खून केल्याची कबुली दिली.

११ मे रोजी गणेश मानकर या सावकाराकडून व्याजाने पैसे हवे असल्याने इतर तीघे त्याच्या सोबत यापुर्वी व्याजाने पैसे दिलेल्या धोंडेगाव शिवारातील बाळासाहेब म्हैसधुणे यांच्याकडे पैसे घेण्यासाठी कारमधून जात होते. त्यांच्या घराचा पत्ता विचारण्यासाठी त्यांनी धोंडेगाव शिवारातील रस्त्याने जात असलेले मोतीराम वामन बेंडकोळी यांना म्हैसधुणेंचा पत्ता विचारला आपणास माहित नसल्याचे त्यांनी सांगताच त्यांच्यात शाब्दीक वादावाद झाली. यातून शिवीगाळीपर्यंत प्रकरण गेल्यानंतर संतापलेल्या चौघांनी बेंडकोळी यांच्यावर चाकून वार केले. बेंडकोळी खाली पडताच चौघांनी कारने पलायन केले.

पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह, अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरिक्षक के. के. पाटील, सहायक निरिक्षक स्वप्निल राजपुत, उपनिरिक्षक रामभाऊ मुंढे, रविंद्र शिलावट, हवालदार हनुमंत महाले, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राऊत, भगवान निकम, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विशाल आव्हाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com