… अन्यथा सरकारी बडगा उगारला जाईल : ना.छगन भुजबळ

… अन्यथा सरकारी बडगा उगारला जाईल : ना.छगन भुजबळ

नाशिक : गोदावरी नदी स्वच्छ झाल्याशिवाय नाशिक शहर हे स्मार्ट सिटी होऊ शकत नाही. त्यामुळे गोदावरी स्वच्छतेला प्राधान्य देत गोदावरीत गटाराचे पाणी येता कामा नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकांमध्ये नदी शुद्धीकरण तसेच प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने सरकारने योग्य ती पाऊल उचलली आहे. त्यादृष्टीने अधिक सुधारणा करण्यासाठी आदेश देण्यात येतील त्यानंतरही जर यामध्ये सुधारणा होणार नसेल तर सरकारी बडगा उगारला जाईल तसेच एसटीपी सेंटर दोषी आढळ्यास त्या ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आज ना.छगन भुजबळ यांनी गोदावरी साक्षरता यात्रेच्या पार्श्वभूमीवर जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह गोदावरी नदीची पाहणी केली. यावेळी नमामी गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सगर, जिल्हा प्रशासन, पर्यारण विभाग यांच्यासह व सबंधित विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक गजानन शेलार, गुरुमित बग्गा, विक्रांत मते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह नाशिकमध्ये गोदावरी साक्षरता यात्रेसाठी आल्यामुळे गोदावरी नदी स्वच्छता कामाबाबत नागरिकांमध्ये पुन्हा एकदा जागरूकता निर्माण होऊन स्वच्छतेच्या कामाला अधिक गती मिळणार आहे. प्रत्येकाने नागरिक म्हणून गोदावरीची आरती करत असतांना आपण शुद्ध गोदावरीची पूजा करत आहोत का? यांचा योग्य विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे नदी स्वच्छतेच्या कार्यक्रमात नागरिक, प्रशासन आणि सेवाभावी संस्थांनी या सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जलतज्ञाच्या विचारांनुसार गोदावरी पात्रात कुठलेही बांधकाम करण्यात येऊ नये तसेच आवश्यक असल्यास एका मर्यादेपर्यंत इको फ्रेंडली कामे करण्यास हरकत नसावी. केवळ बांधकामे करून नदी स्वच्छ करून गोदावरी स्वच्छ होणार नाही. तर फक्त किनारा नव्हे तर गोदावरी स्वच्छ व्हायला हवी ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी गोदा पात्रात कुठल्याही परिस्थितीत गटारींचे तसेच कंपन्यामधून येणारे दुषित पाणी येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com