उद्यापासून दूध दोन रुपयांनी महागणार
स्थानिक बातम्या

उद्यापासून दूध दोन रुपयांनी महागणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । राज्यातील खाजगी आणि सहकारी दूध संघांनी दूध खरेदीसह पॅकबंद दूधविक्रीच्या दरात 2 रुपये प्रतिलिटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या दि. १२ पासून ही दरवाढ लागू होणार असल्याने ग्राहकांना आता गाय व म्हशीचे दूध खरेदी करताना 2 रुपये जास्त द्यावे लागणार आहे.

दूध संघांकडून शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मोबदल्यात प्रतिलिटर 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय पुणे येथील बैठकीत घेण्यात आला असून त्यासोबतच विक्रीच्या दरात देखील दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या (दि.12) पासून ग्राहकांना नव्या दरानुसारविक्री करण्यात येणार आहे.

गायीच्या दुधाच्या खरेदीदरात वाढ होऊन 29 रुपयांवरून 31 रुपयावर दर दिला जाणार आहे. तर म्हशीच्या दुधाला देखील 2 रुपये वाढ देण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिकमध्येही दरवाढ
राज्यात पॅकिंग दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आली असून शेतकर्‍यांना देखील दोन रुपये वाढ देण्याचा निर्णय खाजगी व सहकारी दूध संघानी घेतला आहे. असे असले तरी नाशिकमध्ये मात्र राज्याच्या तुलनेत दूध उत्पादक शेतकऱयांना एक ते दोन रुपये वाढ यापूर्वीच करण्यात आली असल्याने केवळ पिशवीबंद दुधाच्या किमतीतच वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.

नाशिक जिल्हा दूध संघाने गेल्या महिन्यातच दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ केली आहे. तर पॅकिंग विक्रीच्या दुधात मात्र उद्यापासुन 2 रुपयांची वाढ होणार असून 34 रुपये लिटर असणार्‍या पंचवटी दुधाची विक्री आता 36 रुपयांना केली जाणार आहे.

तर जिल्हयातील एकमेव असणार्‍या सिन्नर तालुका दूध संघाकडून गायीचे पॅकिंग दूध 40 रुपये आणि म्हशीचे दूध 60 रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहे. सिन्नर दूध संघाकडून सध्यातरी विक्रीच्या दरात वाढ होणार नाही असे सांगण्यात आले. जिल्हा दूध संघ व सिन्नर दूध संघ शेतकर्‍यांकडून 30 रुपये दराने खरेदी करत आहे. तर सिन्नर संघ 52 तर 55 रुपयांदरम्यान म्हशीच्या दुधाची खरेदी करतो. जिल्ह्यात बाहेरून विक्रीसाठी उपलब्ध होणार्‍या पँकिंग दुधाच्या विक्रीचे दर मात्र 2 रुपयांनी वाढवले जाणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com