Thursday, April 25, 2024
HomeनाशिकDeshdootImpact : त्र्यंबककडे पायपीट करणाऱ्या ‘त्या’ मजुरांची घरवापसी; स्थानिक संस्थेचा पुढाकार

DeshdootImpact : त्र्यंबककडे पायपीट करणाऱ्या ‘त्या’ मजुरांची घरवापसी; स्थानिक संस्थेचा पुढाकार

सिन्नर : रणरणत्या उन्हात घराच्या ओढीने पायपीट करणाऱ्या त्रंबकेश्वर येथील मजुरांना शनिवारी (दि.२८)  दैनिक देशदूतच्या डिजिटल वृत्तामुळे मदत मिळाली. या वृत्तांनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यात काम करणाऱ्या ग्राम सेवा समिती या संस्थेकडून पाठपुरावा करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास या मजुरांना नेण्यासाठी सिन्नर येथे वाहन पाठवण्यात आले.

शनिवारी दुपारी रणरणत्या उन्हात शिर्डी मार्गावर देवपूर फाट्याजवळ डोक्यावर गाठोडे घेऊन मार्गक्रमण करणारे आदिवासी मजुर जात होते. यात सुमारे १६ महिला-पुरुषांसह लहान मुलांचा समावेश होता. त्यांना थांबवत चौकशी केली असता राहता तालुक्यातील वाकडी (खंडोबाची) येथून आम्ही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका दुर्गम आदिवासी पाड्याकडे जात असल्याचे या मजुरांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून अडकून पडलो आहोत, ज्या मालकाकडे कामाला होत, त्याला देखील आम्हाला गावाकडे वाहनातून सोडणे शक्य होत नसल्याने मध्यरात्रीपासून पायपीट करत आम्ही इथवर आलो आहोत.

- Advertisement -

आणखी दोन दिवस चालून गाव गाठू असे सांगत लॉक डाऊन मुळे ओढवलेल्या संकटाशी सामना करत असल्याचे सांगितले. लॉक डाऊन मुले वाहने बंद असल्याने, आम्हाला पायपीट करून घर गाठायचे आहे, आमच्यासारखे अनेक मजूर पायपीट करीत आहेत. असेही ते म्हणाले. यावेळी या स्थलांतराची हकीकत देशदूतच्या माध्यमातून ग्राम सेवा समितीचे हिरामण शेवरे यांना समजली. त्यांनी सिन्नरमध्ये देशदूतच्या प्रतिनिधीशी संपर्क साधत या मजुरांशी बोलणे करून देण्याची विंनती केली. पायी प्रवास करणाऱ्या या मजुरांशी हा संवाद घडवून आणण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील हवालदार सुदाम धुमाळ यांची मोठी मदत झाली.

धर्मेद्र पोटींदे या मजुराचा मोबाईल नंबर धुमाळ यांनी मिळवून दिला. यानंतर शेवरे यांनी या मजुरांशी स्वतः बोलत सिन्नरमधील आदिवासी कार्यकर्त्यांना मदत करण्याची विनंती केली. या मजुरांच्या संध्याकाळच्या जेवणाची आणि आरामाची व्यवस्था देखील झाली. सायंकाळी त्र्यंबकेशवर येथून आदिवासी संघटनेने वाहन पाठवून या सर्व  मजुरांना हलवले. त्यांचा रात्रीचा मुक्काम त्रंबकेश्वरला फरशीवाले बाबा यांच्या आश्रम झाला. त्यानंतर आज दि.२९ दुपारपर्यंत हे मजूर त्यांच्या घरी सुखरूपपणे पोहोचले.

देशदूतच्या डिजिटल वृत्तामुळॆ या  मजुरांपर्यंत पोहोचता आले. गेल्या दोन दिवसांत त्र्यंबकमधील ३०० मजुरांनां त्यांच्या गावी सोडण्यात आले आहे. तर अद्याप तीन हजार पेक्षा अधिक मजूर जिल्हयात विविध भागात अडकून पडले आहेत. स्थानिक सेवाभावी संस्थांनी अशा मजुरांबद्दल माहिती द्यावी. लॉक डाऊन मुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केवळ घराच्या ओढीने हे मजूर पायपीट करत आहेत.

या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यापूर्वी आरोग्य विभागाकडे नोंदणी व तपासणी करण्यात येते. पुढचे किमान दोन आठवडे स्थानिक आशा सेविकांच्या मदतीने त्यांची व त्यांच्या कुटुंबांची वेळोवेळी तपासणी झाली पाहिजे. आम्ही जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार यांच्याशी संपर्कात राहून बाहेर अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

-हिरामण शेवरे, आदिवासी कार्यकर्ता

- Advertisment -

ताज्या बातम्या