Friday, April 26, 2024
Homeनाशिकगंगापूररोड : महिलांसाठी १०८ सूर्यनमस्कारांची मेगा योगाथॉन

गंगापूररोड : महिलांसाठी १०८ सूर्यनमस्कारांची मेगा योगाथॉन

नाशिक । आदित्ययाग, सूर्याष्टकम आणि सूर्यनमस्कारांतून चाललेली सूर्योपासना अशा अभूतपूर्व वातावरणात ‘एसडीएमपी योगाथॉन’चा उपक्रम उत्साहात पार पडला.

रथसप्तमीनिमित्त शहरातील डी. एम. पगार हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी (एसडीएमपी) संस्थेच्या वतीने रविवारी (दि.2) सकाळी गंगापूररोडवरील विरिडियन व्हॅलीत मुली व महिलांसाठी १०८ सूर्यनमस्कारांची मेगा मॅरेथॉन अर्थात योगाथॉन आयोजित करण्यात आला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. विरिडियन व्हॅलीच्या भव्य मैदानावर तब्बल दिड हजारांहून अधिक योगसाधकांनी सूर्याची उपासना केली.

- Advertisement -

यावेळी उपक्रमाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मिसेस ग्लोबल युनायटेड डॉ. नमिता कोहोक, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या संचालिका अश्वती दोरजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुशील वाकचौरे, क्रीडा अधिकारी महेश पाटील, उपजिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शैलेश निकम, निमाचे राज्य कोषाध्यक्ष डॉ. भूषण वाणी, एसएमबीटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड, योगविद्या धामचे तज्ज्ञ मनोहर कानडे, निमा, नाशिकचे अध्यक्ष डॉ. जयश्री सूर्यवंशी, नाशिक जिल्हा योग असोसिएशनचे सचिव संजय होळकर उपस्थित होते.

या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ आदित्ययागाने झाला. त्याचे पूजन स्मिता शिंदे दांम्पत्याने केले. त्यानंतर विपुल अंधारे यांनी केलेल्या शंखनादाने या संपूर्ण वातावरणाला एक वेगळी अनुभूती प्राप्त करून दिली. साई योग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सूर्याष्टकमद्वारे र्‍हिदमिक योगाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. योगपंडित प्रतिभा धस यांनी एकादश ओमकार आणि पतंजली प्रार्थना घेतली. फिटनेस एक्स्पर्ट पूनम आचार्य यांनी वॉर्म अप करवून घेतले. वॉर्म अपनंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. कोवळ्या उन्हातही ऊर्जावान वाटावा असा हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी उपस्थिती लाभली होती.

प्रत्येक सूर्यनमस्काराच्या अवस्थेतून योगसाधक आरोग्य आणि सूर्याची उपासना करत होते. लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सहभागी प्रत्येक व्यक्ती अत्यंत तन्मयतेने सूर्यनमस्काराची आवर्तने पूर्ण करत होता. १०८ सूर्यनमस्कार झाल्यानंतर योगविशारद प्रदीप मोडक यांनी सहजतेने योगसाधकांना योगनिद्रावस्थेत नेले. त्यानंतर पुन्हा ताजेतवाने झालेल्या योगसाधकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या सांगतेला सुरुवात झाली. व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार, आयोजिका डॉ. स्वाती पगार, समन्वयक डॉ. मनीष हिरे, डॉ. राहुल चौधरी, धनश्री धारणकर-घटे, डॉ. मनीष पवार, मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यांचा झाला गौरव
उत्कृष्ट घोषवाक्यासाठीचा प्रथम पुरस्कार मनोरमा शिंदे, द्वितीय – तन्वी बोरसे, तृतीय शरण्या चांदगुडे यांना तर, समूह गटातून ऊर्जेय ग्रुपला प्रथम, निसर्ग योगी संस्थेला द्वितीय, तर स्वामी समर्थ नित्ययोग मंडळाला तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

जीवनगौरव पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ योगशिक्षक कुमार औरंगाबादकर यांचा संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोरजे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या