नाताळसाठी बाजारपेठ सजली; घर सजावटीच्या वस्तुंना मागणी
स्थानिक बातम्या

नाताळसाठी बाजारपेठ सजली; घर सजावटीच्या वस्तुंना मागणी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ फुलली असून ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यासह सांताक्लॉजचे कपडे आणि वस्तू खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. शहरातील विविध भागात असणार्‍या दुकानांमध्ये नाताळ सणासाठी आवश्यक वस्तूंची रेलचेल बघायला मिळत आहे.

ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण असणार्‍या नाताळची पर्वणी साधण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली असल्याचे चित्र आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुकानांमध्ये वस्तूंचे आकर्षक मांडणी करण्यात आली असून विशेषतः बच्चे कंपनीला आकर्षित करण्याकडे दुकानदारांचा कल आहे. येत्या दोन दिवसातहोली रीट, बेल्स, प्रभू येशू आणि मेरी यांच्या मूर्ती, सांताक्लॉजचे कपडे, चांदणी, खेळणी, सांताक्लॉजचा मुखवटा, ख्रिसमस बॉल्स, ट्री आणि टोप्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होईल असा अंदाज आहे.

नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून मिठाई, चॉकलेट आणि केकची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने नाताळासाठी खास केक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय कॉनव्हेंट आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नाताळ सणाचे सेलिब्रेशन होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह संचारला आहे. सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या खरेदीकडे विद्यार्थ्यांचा कल असून लाल आणि पांढर्‍या संगसंगतीच्यासांताक्लॉजच्या पेहरावाला अधिक मागणी आहे.

बाजारात या वस्तूंची रेलचेल
घर आणि चर्चच्या सजावटीसाठी लागणार्‍या वस्तूंसह चांदणी, बॉल्स, हँगिंग बेल्स, सांताक्लॉज कापडी आणि लाइट असलेली टोपी, ख्रिममस ट्री, प्रभू येशू आणि मेरी मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com