नाशिक बाजार समिती उद्यापासून तीन दिवस असणार बंद
स्थानिक बातम्या

नाशिक बाजार समिती उद्यापासून तीन दिवस असणार बंद

Gokul Pawar

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत करोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. लॉकडाऊन काळात सुरळीत सुरू असणाऱ्या कामकाजानंतर दोन दिवसात करोना रुग्ण आढळून येताच समिती मधील सर्वच घटकामध्ये धडकी भरली आहे.

त्यामुळे येथील व्यापारी व हमाल-मापारीचे प्रतिनिधी संचालक यांनी बाजार समितीत करोनाचा धोका वाढला असल्याचे पत्र सभापती आणि सचिवांना दिले. त्यानंतर बाजार समितीतील सर्वच प्रकारचे व्यवहार मंगळवारी (दि. २६) ते गुरुवारी (दि. २८) मे २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, फळे, अन्नधान्य, कांदा-बटाटा आदींच्या खरेदी-विक्रींचे व्यवहार अव्याहतपणे सुरू होते. बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी वेळोवेळी बाजाराचे स्वरुप बदलण्यात आले.

किरकोळ विक्री बंद करण्यात आली. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यासाठी नियम करण्यात आले होते. मात्र, येथील गर्दीवर नियंत्रण आणणे मुश्किल होत होते. येणारे शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची वाहने तसेच बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी सॅनिटायझर टनेल बसविण्यात आलेले होते. गेली दोन महिने करोनाचा शिरकाव रोखण्यास बाजार समितीला यश आले होते. सध्या येथे रुग्ण वाढू लागल्याने येथील भीती वाढली आहे.

नाशिक बाजार समितीत सध्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणीत आहेत. मुंबई आणि उपनगरीय परिसरातील करोना बाधित क्षेत्रातून अनाधिकृतपणे खरेदीदारांची बाजार समितीत ये-जा सुरू आहे. करोना बाधीत रुग्ण आढळल्याने बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याची बाधा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातही करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समितीच्या आवाराचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे झाले आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी किमान तीन दिवस बाजार बंद ठेवणे गरजेचे आहे, अशा मागण्यांचे पत्र हमाल-मापारी प्रतिनिधी संचालक चंद्रकांत निकम व व्यापारी प्रतिनिधी जगदीश अपसुंदे यांनी बाजार समितीला दिले.

बाजार समितीत करोना बाधीत रुग्ण आढळल्याने येत्या तीन दिवस दिंडोरी रोड आणि पेठरोड येथील दोन्ही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. (दि. २६) ते (दि. २८) मे या काळात बाजार समितीच्या आवाराची साफ सफाई करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
– अरुण काळे, सचिव, बाजार समिती

Deshdoot
www.deshdoot.com