कोरोना वॉरीयर्स : रुग्णसेवा सांभाळून जेजुरकर करताय कापडी मास्कची निर्मिती

कोरोना वॉरीयर्स : रुग्णसेवा सांभाळून जेजुरकर करताय कापडी मास्कची निर्मिती

नाशिकरोड । का.प्र.
जगभर कोरोनाच्या विषाणूने थैमान घातलेले असताना जेलरोड येथील शरद जेजुरकर हे आपली रुग्णालयाची नोकरी सांभाळून गरीब वंचित घटकांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मास्कची निर्मिती करत आहे. त्यांच्या या कार्याला परिसरातील स्वयंसेवी संस्था, संघटना व व्यक्ती चांगला प्रतिसाद देत असून त्यांच्या मास्कची अत्यल्प दरात विक्रमी विक्री होत आहे.

नाशिकरोड मधील एका खाजगी रुग्णालयात रुग्णसेवा देणारे जेजुरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय रुग्णालयाचे प्रशासन सांभाळताना त्यांनी स्वतःचा जुना टेलरिंगचा छंद कोरोना थैमानाचा सामना करण्यासाठी पुन्हा जागा केला आहे. सकाळी नऊ ते पाच ड्युटी करून ते आपल्या घरी टेलरिंग मशीनवर कापडी मास्क तयार करतात. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर शिवलेले पाच मास्क घरच्यांच्या सुरक्षेसाठी बनवले. त्यानंतर हे मास्क पाहून नागरिकांनीही मागणी केली. लोकांच्या विनंतीस मान देत बाजारातून हिरवा कपडा आणून ते आता मास्क तयार करत आहेत.

सध्या बाजारात सर्वच प्रकारच्या मास्कची विक्री चढ्या दराने होत असताना जेजुरकर यांचे कापडी मास्क अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. जेजुरकर यांनी आजपर्यंत जवळपास साडेपाचशे मास्क तयार करून स्वयंसेवी संस्थांना मदतीचा हात दिला आहे. शासनाने नाशिकमध्येही मास्कचा वापर अनिवार्य केल्याने जेजुरकर यांचे अल्प दरातील कापडी मास्क नागरिकांसाठी दिलासा देणारे आहेत.

बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर आपण मास्क निर्मिती करीत आहे. दानशूर व्यक्ती हे मास्क घेऊन गरजूंना वाटतात. हे मास्क रोज वापरल्यानंतर धूऊन डेटॉलने निर्जंतुक केल्यास दिवसभर ते धुळीकण व कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करतात.
-शरद जेजुरकर

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com