मनमाडचे द्राक्षे पोहोचले चक्क अमेरिकेला; ऍग्रीकल्चर डिप्लोमा केलेल्या सचिनची किमया
स्थानिक बातम्या

मनमाडचे द्राक्षे पोहोचले चक्क अमेरिकेला; ऍग्रीकल्चर डिप्लोमा केलेल्या सचिनची किमया

Gokul Pawar

मनमाड । बब्बू शेख : शहरातील द्राक्षे पोहोचले चक्क अमेरिकेला..असे म्हटले तर सहजपणे त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही..ज्या शहरातील नागरिक वर्षानु वर्षे भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागते, त्या शहरात द्राक्षे बागाची लागवड शक्यच नाही पण हो हे वास्तव असून मनमाड शहरातील द्राक्षांची चव थेट अमेरिकन लोक घेत असल्याची किमया घडवली आहे ती एका उच्च शिक्षित तरुणाने.

सचिन दराडे असं या युवकाचे नाव असून जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्याने यश मिळवले आहे. उच्च शिक्षण घेवून नोकरीच्या मागे न लागता त्याने वडिलोपार्जीत असलेल्या शेतीत नवीन प्रयोग करून द्राक्ष बागेची लागवड केली आणि त्यात तो यशस्वी देखील ठरला. त्याचे द्राक्षे अमेरिकेत निर्यात झाले असून याद्वारे लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळाले आहे. परिसरातून या तरुण शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.

शहरातील नगर चौकी भागात सचिन दराडे यांची वडिलोपार्जीत शेती असून त्यात ते मका,बाजरी,कापूस अशी पारंपारिक पिके घेत होते. सचिनने शिक्षण पूर्ण केल्यानंतर कृषी क्षेत्रात डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर त्याला चांगली नोकरी मिळाली होती. परंतु प्रयोगशील शेती करण्याचं निर्धार त्याने घेतला. आणि
तीन एकरात द्राक्ष बाग लागवड केली. शेतीसाठी शेततळे उभारून सेंद्रिय शेतीचा वापर केला. शेतीकरिता लागणारे सर्व साहित्य व सामुग्री उभारण्यासाठी काका विजय दराडे यांची मोलाची साथ मिळाली.

दरम्यान या दोघांनी अथक परिश्रम घेत तीन एकरात सोन पिकवले. यानंतर द्राक्षे निर्यातक्षम असल्याने काही व्यापाऱ्यांनी सचिनशी संपर्क साधला आणि द्राक्षे अमेरिकेला निर्यात करण्याचा प्रास्तव त्याच्या समोर ठेवला. पहिल्याच लागवडीत आपले द्राक्षे थेट अमेरिकेला तर जात आहेत, तसेच यातून उत्पन्नही भरघोस मिळणार असल्याचे पाहून काका-पुतण्याला खूप आंनद झाला.

सचिनने मनमाड शहराचे नाव थेट सातासमुद्रपार पोहोचविल्यामुळे परिसरात कौतुकाचा विषय झाला आहे. खऱ्या अर्थाने प्रयोगशील शेतीतुन नवा आदर्श सचिनने घालून दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com