सर्वसामान्य प्रवाशांचे कॅशलेस प्रवाशाचे स्वप्न भंगणार

सर्वसामान्य प्रवाशांचे कॅशलेस प्रवाशाचे स्वप्न भंगणार

नाशिक । केंद्राच्या ‘डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया’अंतर्गत सुरू झालेल्या एसटीच्या कॅशलेस प्रवासासाठी प्रवाशांना तूर्तास वाट पहावी लागणार आहे. सुट्या पैशामुळे होणारे वाद टाळण्यासाठी महामंडळाने सुविधा कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सध्या त्याची अंमलबजावणी रखडली आहे.

‘युती’ सरकारच्या काळातील कॅशलेस योजना ’महाविकास आघाडी’ सरकारच्या काळात राबवण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये संभ्रम आहे. कॅशलेस कार्ड योजना सुरू करण्याबाबत सुरुवातीपासूनच वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये एकमत नव्हते. एसटीचा प्रवासी ग्रामीण भागात जास्त असल्याने त्याला कार्ड प्रवास जमणार नसल्याचे मत वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांचे होते. तर कार्डवर सवलत, कॅशबॅक अशा ऑफर दिल्यावर प्रवासी या कार्डकडे आकर्षित होतील, शिवाय या योजनेमुळे ‘डिजिटल इंडिया’ योजनेला ही प्रोत्साहन मिळेल, असे मत दुसर्‍या गटातील अधिकार्‍यांचे होते.

तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महामंडळाच्या वर्धापनदिनी हे कार्ड सुरू करण्याचे घोषित केले. कार्डची काही एसटी स्थानकांमध्ये नाममात्र चाचणी झाली. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून महामंडळाला अध्यक्ष नसल्याने केंद्राच्या धर्तीवर सुरू झालेली सुविधा कार्ड योजना अडगळीत पडली आहे. ‘मुंबई लोकल’च्या एटीव्हीएम कार्डच्या धर्तीवर एसटीचे सुविधा कार्ड आहे. या कार्डची किंमत 50 रुपये असून; पहिले रिचार्ज 300 रुपयांचे करणे आवश्यक आहे.

यानंतर 100 ते 5000 रुपये अशी रिचार्ज करण्याची सुविधा कार्डमध्ये आहे. कुटुंबीयांसह मित्र परिवारामध्ये कॅशलेस प्रवासाची सवय लागावी, यासाठी हे कार्ड हस्तांतरणीय आहे. एसटीच्या 71व्या वर्धापनदिनी या योजनेची घोषणा तत्कालीन परिवहन अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कार्डसाठी सर्व तिकीट मशीनमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार काही तिकीट मशिनमध्ये बदलही केले गेले. मात्र योग्य प्रचार-प्रसाराअभावी चाचणीनंतर पूर्ण क्षमतेने या कार्डची अंमलबजावणी झालेली नाही. प्रतिसादाबद्दल माहिती नाही.

‘कॅशलेस प्रवासासाठी एसटीचे सुविधा कार्ड सुरू आहे. मात्र सुविधा कार्डबाबत प्रतिसाद, एकूण तिकीट विक्रीपैकी कार्डमधून होणारी तिकीट विक्री, कार्डधारकांची प्रवासी संख्या, राज्यातील विविध विभागांचा कार्डबाबत अहवालाची माहिती उपलब्ध नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com