दाभाडी येथील दीडशे खातेदारांना चुना; महाराष्ट्र बँकेसमोर आत्मक्लेश आंदोलन
स्थानिक बातम्या

दाभाडी येथील दीडशे खातेदारांना चुना; महाराष्ट्र बँकेसमोर आत्मक्लेश आंदोलन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखेत सुमारे दीड कोटी रुपये रकमेचा अपहार झाल्याची घटना सात महिन्यांपूर्वी घडली होती. या शाखेत कार्यरत बँक मित्रांनी काही अधिकार्‍यांच्या संगनमताने जवळपास दीडशे खातेदारांना चुना लावल्याचा प्रकार उघडकीला आल्यावर खातेदारांना काही प्रमाणात पैसे देण्यात आले. मात्र आम्हाला आमच्या खात्यावरील रकमा तत्काळ परत करा अशी मागणी या खातेदारांनी करून महाराष्ट्र बँकेच्या गडकरी चौकातील प्रधान कार्यालयासमोर आज आत्मक्लेश आंदोलन केले.

आम्ही आमची किडनी, डोळे व हृदय हे अवयव विक्रीला काढले आहेत असे फलक घेऊन रस्त्यावर ठिय्या दिलेल्या आंदोलकांमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. बँकेतील अपहार उघडकीस आल्यावर बँकेकडून संबंधित खातेदारांना काही प्रमाणात परतावा देण्यात आला. मात्र बचत खात्यावर भरणा केलेली संपूर्ण रक्कम परत करावी, अशी मागणी खातेदार अनेक महिन्यांपासून करत आहेत.

त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या खातेदारांनी अपहारबाधित कृती समितीच्या नेतृत्वाखाली गडकरी चौकात आंदोलन छेडले होते. महाबँकेच्या दाभाडी येथील शाखेत तिघा बँक मित्रांनी काही अधिकार्‍यांना हाताशी धरून हा प्रकार केला होता. खातेदारांमध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, विधवांचा समावेश आहे. शासनाच्या विविध योजनांचे अनुदान, कष्ट करून केलेल्या कमाईचा काही भाग खातेदारांनी विश्वासाने बँकेत जमा केला होता. मात्र बँक मित्रांनी पॉस यंत्रांवर खातेदारांचे अंगठे घेऊन परस्पर रकमा काढून घेतल्या व त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या अपहाराच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बँक प्रशासनाने आतापर्यंत साठ लाखांचा परतावा संबंधित खातेदारांना दिला. उर्वरित रक्कम परत मिळावी यासाठी खातेदारांकडून अर्जदेखील भरून घेण्यात आले होते. मात्र या अर्जांची छाननी करून ते नामंजूर करण्यात आल्याची नोटीस बँकेकडून पाठवण्यात आल्याने खातेदार आक्रमक बनले आहेत. आमचे कष्टाचे पैसे बँकेने परत करावे, अशी मागणी खातेदारांकडून करण्यात येत असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आजचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. शेखर पवार, चंदन पवार, प्रशांत पवार, नितीन पवार, अनिल हिरे, जिभाऊ माळी, तारा पवार, संजय पवार, संगीता माळी, मीरा गायकवाड, गंगाराम पवार, रेखा पवार, देवदास पवार, सुभाष देवरे, सपना सोनवणे, युनूस शहा, आनंदा निकम आदी खातेदार यावेळी सहभागी झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com