त्र्यंबकेश्वर :  ग्रामीण भागात भाजीपाला दर गगनाला; लॉक डाउनच्या नावाखाली लुटालूट
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : ग्रामीण भागात भाजीपाला दर गगनाला; लॉक डाउनच्या नावाखाली लुटालूट

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन लॉकडाऊन असून अशावेळी ग्रामीण भागात भाजीपाला दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मोलमजुरी करून पोटं भरणाऱ्या ग्रामस्थांना अवाजवी दरात भाजीपाला विकत घेण्याची वेळ आली आहे.

दरम्यान येत्या १४ एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन असून नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु दुकाने खुली ठेवण्यात आली आहेत. यामध्ये शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला, २४ किराणा, मेडिकल्स उघडी असल्याने येथील नागरिकांना पुरेशा प्रमाणात प्रशासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात अशा प्रकारचे नियोजन नसल्याने याचाच फायदा उचलत काही भाजीपाला व्यापाऱ्यांनी भाववाढ केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठया प्रमाणावर लूट सुरु आहे. यामध्ये बटाटे ४०, कांदे ३०, टमाटे ३० तर किरणांमध्ये तेलाचे भाव १०० पार असून डाळींमध्ये कमालीची तफावत बघायला मिळत आहे.

तालुक्यात लॉक डाऊन ला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी येथील नागरिकांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच पैशाची चणचण असल्याने पुढील महिनाभराचा किराणा किंवा तत्सम जीवनावश्यक वस्तू घेण्यास परवडत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच परिसरातील भाजीपाला विक्रेते अवाजवी दरात भाजीपाला विकत असून यामुळे सारासार लूटालूटच चालू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

गावागावात झुंबड

सध्या इतर साधनापेक्षा येथील नागरिकांना जगणे महत्वाचे असल्याने जेवढे शक्य होईल तेवढ्या दरात भाजीपाला विकत घेत आहेत. यामुळे ठिकठिकाणी घेण्यास नागरिकांची झुंबड दिसून आली.

Deshdoot
www.deshdoot.com