संचारबंदीतील कथा : भाकरीचा प्रवास
स्थानिक बातम्या

संचारबंदीतील कथा : भाकरीचा प्रवास

Gokul Pawar

आतापर्यंत ममई कव्हांच माग पडली होती, पोर बी चालून चालून पार दमली व्हती..बोचक पाठीवर घेत तुक्या पाऊलं टाकू लागला, त्या मग त्याची बायको रखमीन, लहान पिंट्याला कडेवर घेत संगीच्या हाताला धरून तुक्यामाग चालू लागली…

तेवढ्यात संगीची माय म्हणली, ‘काय व एखाद्या गाडीला हात बित द्या…आपण चालू पण पोरांचं काय…’
‘व्हय व्हय , पण गाडी थांबाया नग’, उसासा टाकत तुक्या बायकोला बोलला…

बरंच अंतर कापून झालं व्हतं, संगीन मायकड भाकरीसाठी गाऱ्हाणं लावलं…
‘आई, लय भूक लागलिया..काहीतरी देना…’
‘थांब ग माझे बये..पुढं एक गाव लागलं , तव्हा तुला भाकर देती…’ तिला वढीत नवऱ्याच्या माग चालू लागली..
लय येळ झालता…कुटच माणसं दिसत नव्हती…वर उन्हाच्या झळा…तुक्या बोचक नीट करीत झपाझप रस्ता कापित व्हता…मधीच एखादी ट्रक त्यांला मग सोडून जाई…

उन्ह डोक्यावर आलं व्हतं…तेवढ्यात
मायच्या कुशीतच झोपी गेलेला पिंट्या बी उठून मम् मम् करू लागला…मायन त्याला थोपटवत ‘झोप झोप करू लागली…’
‘काय व काय झालं…’ तुक्यान चालत चालत रखमीला ईचारल…
‘आव पिंट्याला तहान लागलिया… अन बाटलीतलं पाणी बी संपलया …’

‘एक काम कर, त्या तिथं झाडाखाली बुड टेका, म्या पाणी कुड भेटतंय का बघतो…’
रखमीन दोन्ही पोरांना घेत आंब्याच्या झाडाखाली बसली. … चालून चालून जीव नकोसा झाला व्हता… तोच तुक्यान बाटलीत पाणी आणलं…

‘घे पाज पोरांना…’
पोरबी आधासाने घटा घटा पाणी पिऊ लागली. वझ खांद्यावरून उतरवत तुक्यान बी झाडाखाली बुड टेकल..

बसल्या बसल्या रखमी म्हणली, ‘कव्हर पाणी पाजायचं.. पोर भाकर मागताय …. कालपासून त्यांच्या पोटात पाण्याशिवाय काहीच गेलं न्हाय…’

‘थोड्यावेळ पाण्यावर भागव…इथून एखादं मैलावर गावं लागतंय… बघू काही भाकर तुकड्या ची सोय व्हती का….’ तुक्यान वझ उचलता उचलता बायकोला सांगीतल…

तिन्ही मायलेक भर उन्हात वाट तुडवू लागली…सुनसान रस्त्यांवर उन्हाच्या झळांशिवाय काहीच दिसत नव्हतं…बरंच अंतर चालून झाल्यावर रस्त्याच्या कडेला एक झोपडीवजा घर दिसलं… उन्हामुळ बाटलीतल पाणी गरम, अन अंगातल पाणी कमी होत चाललं व्हतं…
संगीच अवसान गळाल्यागत झालं व्हतं…तुक्यान त्या घराकडं पाऊल वळवली तशी हे दोन्ही मायलेक त्याच्या पाठीमाग चालत सुटली….

तुक्यान आवाज दिला , ‘कोण हाय का घरात…’
तेवढ्यात एक आवाज आला, ‘कोण हाय…
‘वाईस, पाणी पाहिजे हूत…म्हणून अलतो… एक सत्तरऐंशी वरशाची म्हातारी डोळ्यांच्या वर हात ठेवत ,
बसा म्हणली…
‘कुडल पाव्हन म्हणायचं, पाणी देता देता म्हातारी म्हणली…
‘आम्ही व्हय, लय लांबच हाय…तिकडं भोयगावच… चालून चालून पार दमलो.. म्हणलं थोडा इसावा खाऊ, म्हणून आलो…’
तुक्यान पाणी पीत पीत उत्तर दिलं..

‘लय दमल्यागत झालाय नव्ह, पोर बी जाम झालिया, वाईस
भाकर-तुकडा असलं द्या म्हणलं..’
रखमीन काकुळतीला येत ईचारल…

‘बायोव, माझं कुणीच नाय इथं, एखादा वाटसरू तर मला खाया देतूया… शिब्यात बी काहीच न्हाय…थांब काहीतरी बघते…’ अस म्हणत म्हातारीन घरात जाऊन शिब्यातल उरलेलं आणून दिलं…
‘माय, लय उपकार झालं तुमचं…’ तुक्या पुटपुटला…
पोटात कावळ…वरडत असलेली संगी भाकरीवर तुटून पडली..रखमीन तिला चतकोर भाकर हातावर देत , तीन तुक्याच्या पुढं अर्धी भाकर दिली..तर तुक्यान नाही म्हणत तुम्ही खा म्हणून सांगितलं…. अव खा थोडंस, पोटात अन्नाचा कण न्हाय…तेवढ्यात पिंट्या झोपेतून उठून रडू लागला.. रखमीन त्याला दूध नसलेल्या थाण्याला लावत.. कसबस शांत केल.. तीन बी चतकोर भाकर खाया घेतली…उरलेली अर्धी भाकर तशीच सांच्याला बांधून ठेवली.. संगीन चतकोर भाकर कुठंच फस्त केली व्हती..म्हणून खपाटीला गेलेल पोट अजून खाया मागत व्हतं…रखमीन तिला न्हाय म्हणून सांगितलं.. अधासाने संगीन घटा घटा पाणी पीत पॉट भरलं…

म्हातारी अंग टाकता म्हणली…वाईस थोडा आराम करा, उन्ह उतरली की जा म…
तुक्यान अंग टाकलंच व्हतं…संगी बी पेंगळुन झोपी गेली…रखमीन पिंट्याला झोपवत कुडाच्या भिंतीला अंग टाकून झोपी गेली….

सायंकाळचे पाच वाजत आले होते, तरीही उन्ह उतरायचं नाव नव्हतं… रस्त्यावर गाड्यांच्या रांगा रांगा लागल्या व्हत्या, गाड्यांच्या आवाजानं तुक्याची झोप मोडली..डोळ चोळत रस्त्यावरची गर्दी पाहू लागला…त्याच्या सारखच अनेक बिऱ्हाड घरी चालली व्हती…

रखमे, अय रखमे उठ, आता निघावं लागलं…

तशी रखमी भानावर येत सावरत उठली…
तीन संगीला उठवत, पिंट्याच्या तोंडांवरून हात फिरवत मुका घेतला…संगीला तोंडावर पाणी मारायला सांगितलं…

तुक्यान बोचक्याची आवराआवर करीत म्हातारीच्या पाया पडतं रखमीला निघण्यास सांगितलं….
सकाळी रस्त्याला कुणी नव्हतं पण आता माणसाचे लोंढे दिसत होते. काही माणसं सावल्या पाहून विसावली होती..

तुक्यामाग रखमी अन संगी चालू लागली..आता पिंट्याच्या चेहरा खुलला होता..आजूबाजूला गाड्याच्या आवाजान तो खिदळत व्हता… रस्त्यावरची माणस एकमेकांना विचारपूस करीत, कुठून आल…कुठं जाणारं… अस सगळं चालू होता..तुक्या बी आपली माणसं भेटत्यात का या इराद्याने इकडं तिकडं पाहत चालत व्हता… पण कुणी दिसत नव्हतं…
कुणी सायकलवर, कुणी बाळाला पाठोशी बांधून, कुणी फक्त कपड्यांवर घरी परतत व्हते..

आतापर्यंत रात्र होऊन गाड्यांनी विसावा घेतला व्हता… आजूबाजूला अंधार फक्त दूरवर मिणमिणता दिवा दिसत व्हता…रात्र कुड काढायची म्हणून तुक्या रखमीला ईचारीत व्हता… तीन चार तास चालून पाय नको म्हणत होते….काही अंतर चालून झाल्यावर पायी चालणाऱ्या माणसांनी ठिकठिकाणी जमिनीला अंथरून केलं होतं…तुक्यान बी ठरविलं..इथं माणसांत राहून आजची रात्र काढू उद्या सकाळीच घराकडं निघू….

रखमीला त्यानं हा इचार सांगितला… रखमीत शिन उरला नव्हता… पोरालाबी इसावा पाहिजे व्हता…. मग तुक्यान रस्त्याच्या कडेला एक झाड बघून आराम करायचा ठरवला…

म्हातारीन दिलेला भाकरीचा तुकड्यातून संगीला अन थोडा नवऱ्याला दिला… रखमीन पाणी पीत भाकरीचा तुकडा पाण्यात बुडवून पिंट्याला चारू लागली…
कसंतरी आजची रात्र काढू , इथून जवळच एक गाव हाय…तिथं जेवणाच काम व्हईल…काही माणसं जेवण देताय म्हण…..

अस म्हणत त्यानं संगीला कुशीत घेत डुकल्या घेऊ लागला…
‘शहरातून गाड्या सुरू झाल्यात म्हण, न्हाय त्या शेजारी बसलेल्या बायामाणसं बोलत व्हत्या म्हणून..’
‘व्हय व्हय म्या बी ऐकल… झालं तर बरच व्हईल…तू अन संगी चालून चालून लय दमल्यात…तेवढंच बरं होईल, म्या काय चालत येईल…’
तुक्या झोपल्या झोपल्या बोलत व्हता..
‘अस न्हाय आपण चौघ बी एकत्रच जाऊ…’ अस म्हणत पिंट्याला झोपवल…
दोघांनाबी बोलता बोलता कधी डोळा लागला समजलच नाही….

पहाट चे तीनेक वाजले असतील..सगळी मंडळी गाढ झोपेत व्हती…अशातच जोरदार आवाज आला..आवाजानं आजूबाजूची मंडळी उठून पळू लागली… काय झालं, काय झालं म्हणून ओरडू लागली…रात्रीच्या निरव शांतता या आवाजान भंग झाली होती..क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं होतं….एक कुटुंब उध्वस्त झालं होतं….
एक ट्रक झाडावर येऊन आदळला होता…ज्या झाडाखाली हे कुटुंब विसावल व्हतं..या अपघातात उद्या घरी जाणार या विचारानं झोपलेलं कुटुंब कायमच झोपलं होत…
तुक्या, रखमी, संगी अन पिंट्या कुठंच नव्हता….फक्त भाकर नजरेस पडली होती…

– गोकुळ पवार

gokulpawar4@gmail.com

८८०५५३९७०६

Deshdoot
www.deshdoot.com