Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगसंचारबंदीतील डायरी : माणूस तगला पाहिजे, जगला पाहिजे

संचारबंदीतील डायरी : माणूस तगला पाहिजे, जगला पाहिजे

इटलीतील फ्रांन्सेस्का मेलंड्री यांनी करोनाच्या जीवघेण्या काळात एक पत्र लिहिलंय आपल्यासाठी. काही दिवसांपूर्वी  मुक्ता बर्वेच्या आवाजात ते ऐकलं, ऐकून झिणझिण्या येतात मेंदूला आणि ‘करोनानंतरचे जग ‘ कसे असेल ? याचे सुन्न करणारे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. नकळत आत डोकावून बघतो आपण आणि बाहेरच्या जगासही न्याहाळू लागतो काहीशा अनिश्चिततेच्या सावटाखाली!  मनातही काहूर दाटलेलं, विचारतरंग उठताय अजूनही…त्यातून जन्माला आलेल्या ह्या काही नोंदी आणि काही प्रश्न…

काही दिवसांपूर्वी सारंच वेळापत्रक बिघडलंय हल्ली! हे माझंच नाही तर जगातल्या बहुसंख्य लोकांचं होत असेल या काळात याबाबत खात्री वाटते. जागण्याच्या वेळी झोप आणि झोपेच्या वेळेला टक्कं जाग असते डोळ्यात. डोळे शांत झोप विसरलेत…..

- Advertisement -

सकाळचे जेवण दुपारी चार वाजेपर्यंत होतेय आणि संध्याकाळचे जेवण मध्यरात्रीच्या थोडे आधी होतेय … तसं म्हंटलं तर भूकही लागेनाशी होते कारण कष्टाचं असं कामंच नाहीये काही. पोटाकडे बघून नाही तर घडाळ्याकडे बघून नाश्ता, जेवणं औपचारिकपणे आटोपली जाताय. खरी भूक केव्हा लागेल….?

फोनशी खेळावं, वॉट्सपवरून फेसबुकवर, फेसबुकवरून टिकटॉकवर, टिकटॉकवरून ट्विटरवर , ट्विटरवरून इन्स्टाग्रामवर आणि इंस्टाग्रामवरून पुन्हा येरे माझ्या मागल्या वॉट्सपवर…. पण एका क्षणाला हे काहीच मन रमवत नाही. उगाच टीव्हीचे चॅनेल्स बदलत बसावेत वा डोळे उघडे ठेवून छताकडे बघत नुसतं पडून राहावं…हा शून्य कधी फुटेल??? सारेच सिनेमे, त्यातील अभिनेते असफल झालेत करोनामुळे आलेली धास्ती आणि मरगळ कमी करण्यात….

पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळणं सुरूच असतं. पहाटे उशिरा कधीतरी डोळा लागला की , सकाळची उन्हं डोक्यावर आल्यावर, डोळे उघडू लागतात किलकिले होत… तोवर अर्धा दिवस संपलेला असतो आणि  अर्धा दिवस ‘आ’ वासून समोर उभा असतो….

झोपेतून उठल्यावर अद्ययावत माहितीत नवीन करोना रुग्णांची संख्या, बरे झालेले, मृत पावलेले वगैरे आकडे पाहावेत. कारण आता तोही एक ‘रूटीन’चा भाग झालाय  काही दिवसांपूर्वी हळहळ वाटतही होती पण रोज नियम मोडणारे, ताळेबंदीतही खुशाल सकाळी फिरायला जाणारे, संचारबंदीतही कसल्या कसल्या वाहनांमध्ये दाटीवाटीने गावाकडे चोरून पळणारे, भाजीपाल्यावर बाजारात तुटून पडणारे, शासनाच्या नियमांचे तीन-तेरा वाजवणारे, मला काहीही होणार नाही वगेरे व्यर्थ अति आत्मविश्वास बाळगणारे, स्वतःबरोबर इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करणारे प्राणी बघितले की, आपल्या काळजी करण्याने काहीच साध्य नाही व त्याशी कुणाला काही देणेघेणे नाही हे समजलेय…

या करोनाकाळात गावी परतून जगण्यासाठी जी वाट लोक चोखाळताय ती मरणाच्या जवळची आहे. पण खूप मोठा वर्ग जो भाकरीसाठी चाकरी करतो. पडेल ते काम करतो , आपले जगणे सुकर करतो ,त्याची अशा कठीण काळात काय आर्थिक तजवीज असणार? काय खात असतील हे लोक? कसे जगवीत असतील कुटुंब??

शासन मोफत धान्य गावोगावी रेशन दुकानांवर उपलब्ध करून देतंय . ते शेवटच्या गरजू जीवापर्यंत पोहचतंय का? त्याचा वेग भूक व भूकबळीपेक्षा अधिक आहे का? यातही तुमडी भरून घेणारे ‘संधीसाधू’ असणारंच, त्यांचं काय???

प्रत्येकाने जर स्वतःची काळजी घेतली, घरातच थांबून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले तर हे सैराभैरा माजलेले वादळ शमेल. पण लक्षात कोण घेतो??? ‘नियम मोडण्यासाठीच असतात’ ही फुशारकी मिरविण्यात तर आम्ही सर्वात पुढे असतो नाही का…?

इथे घरात आगाऊ किराणा भरून ठेवलाय, पाहिजे तो पदार्थ केव्हाही बनवून खाता येतोय, खात्यावर पुरेसा पैसाही आहे, दिमतीला सारी मनोरंजनाची सुखावह साधने हजर आहेत आणि कला वा सर्जनशीलतेचे वावडे आहे अशा ‘विशेष’ वर्गालाच घरात बसून कंटाळा येतोय, जगणे अर्थहीन वाटतेय. दुसरीकडे परगावी मोलमजुरी करणारा मजूर गाव, आप्त यांच्या अनावर ओढीपोटी शेकडो मैल पायी चालून गावाची वाट धरतोय. मोठ्या त्रासानंतर गावची माती कक्षेत येते तेव्हाच अतिश्रमामुळे देह धाडकन जमिनीवर कोसळून निष्प्राण होतो यांना कंटाळा, थकवा वगैरे नसेल आला का हो चालायचा? जो दोन वेळेला खाऊन पिऊन सुखवस्तू कुटुंबांना येतोय…..

या काळात सामान्य जनता ‘अंतर्मुख’ झालीय. ‘जग आणि जगणं’ याबाबत शहाणपण आलेय बरेचसे तिच्यात पण राजकारणी, पक्ष, नेते यांची कातडी गेंड्याची ती गेंड्याचीच. आजही करोनाच्या आड ते नेहमीप्रमाणे ‘समाजसेवा’ करताय. मतदानाच्यावेळी डोळे खरोखर ‘उघडे’ ठेवायला हवे होते असे इथे बरेच लोकांना प्रकर्षाने वाटत असेल ….

या काळात आणखी एक  महत्वाची घटना घडली. ती म्हणजे जवळच्या मित्रांच्या मनातील अमुक एका समूहाबद्दल, जाती-धर्म वा पंथ याबद्दलचा विखार अनेक समाजमाध्यमांमुळे उघड झाला. किती एकांगी विचार करणारे वा ‘मेंदू-विचार-तर्क’ यांच्याशी सपशेल फारकत असणारा मित्रपरिवार आपण बाळगत होतो याची लाजही वाटू लागलीय. त्यातही आशेने सप्रमाण वास्तव सांगायला गेलो तर त्यांच्या मनातील सांप्रदायिक द्वेष इतका खोलवर रुजला होता की , अनेकांशी मैत्री तुटली दुरावा-अबोला निर्माण झाला पण त्यांची विषमतेची टणक समजूत तोडता आलेली नाहीये…..हे मोठं अपयश त्रास देतंय!

कित्तीतरी जवळची , जिवाभावाची माणसं, नातेवाईक, कलाकार कायमची हरवली परतून न येणाऱ्या प्रदेशात कायमची निघून गेली. जाण्यासाठी हाच काळ का निवडावा त्यांनी? वा नियतीनेही ह्याच काळात का हिरावून न्यावे त्यांना? कोणत्या नकारात्मक विचारांचे थैमान, खचलेपण असेल बरं त्यांच्या आत? यात सर्वात वेदनादायी काय ? तर जवळच्या कुणालाही शेवटचा निरोप देण्यासाठी आपणास जाणे शक्य झालेले नाही. मुलगा गेला तर आई त्याला शेवटचे बघू शकलेली नाही की, तो आईला शेवटचे. मुल बापाचे शेवटचे दर्शन मोबाईलद्वारे घेतेय, तिरडीवर विसावलेल्या बापाला ते न्याहाळतेय पण त्याला शेवटचा स्पर्शही करू शकत नाही….कित्ती असहाय केलंय? किती हतबलता दिलीय नं ह्या काळाने?

जगण्यासारखं खूप काही आहे अजून आणि पूर्ण करावीत अशी अपुरी स्वप्नंही आहेत डोळ्यात! गढूळलेलं सर्व काही स्वच्छ होईल एक दिवस पण तोवर या देशातला प्रत्येक माणूस तगला पाहिजे जगला पाहिजे. हे लिहितानाही ‘त्या’ दिव्यांच्या उत्सवातच आयुष्यातल्या अंधाराने खचलेली आणि आपल्या तीन चिमुरड्यांना स्वतःच्या हातांनी पाण्याच्या पिंपात बुडवून मारणारी ती असहाय आई छताला लटकलेल्या अवस्थेत मला दिसू लागते…हल्ली डाळ, तांदूळ वा कोणतेही धान्य निवडताना सांडलेल्या धान्याचा कण नि कण वेचून घेतेय मी …..

*डॉ.प्रतिभा जाधव*
*नाशिक*
मो.9657131719

- Advertisment -

ताज्या बातम्या