लॉक डाऊनमुळे हाती पैसा नाही, घरखर्च कसा चालवायचा, खायचे काय; सर्वसामान्य उद्विग्न

लॉक डाऊनमुळे हाती पैसा नाही, घरखर्च कसा चालवायचा, खायचे काय; सर्वसामान्य उद्विग्न

नाशिक : लाॅकडाउन असल्याने सर्वच लाेक घरात बसून आहेत. बाहेर जायचे ठरले तरीही दुकाने, बाजारपेठ बंद आहे. त्यात आता पुन्हा ३० एप्रिलपर्यंत राज्याचा लाॅकडाउन वाढविण्यात आला आहे. पगारदार, राेजंदारी करणाऱ्यांसाठी हा कठिण काळ असून अनेकांना राेजंदारीचे पैसै व पगार मिळणे अशक्य झाले आहे.

बहुतेक व्यवसाय, राेजगारावर बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळली असून पैसे व किराणाच नसल्याने घरखर्च कसा चालवायचा, खायचे काय असा उद्विग्न प्रश्न सर्वसामान्य करत आहे. त्यातून येत्या काळात अनेकांचा संयम सुटू शकताे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कराेना व्हायरसमुळे अनेकांनी जीव मुकला आहे. त्याचा प्रसार वाढू नये म्हणूण राज्यात लागू करण्यात आलेला लाॅकडाउन पुन्हा १५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. चीनहून आलेल्या या व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरले असतांना एकूण अर्थव्यवस्था काेलमडली अाहे. माेलमजुरी करणारे कामगार, श्रमिक, दरमहा पगार घेणारे खासगी अस्थापनांचे कर्मचारी यांना एकवेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे.

अनेक लाेकांचे कर्जाचे व बचत गटाचे हप्ते, किराणा माल, घराचे व रिक्षाचे भाडे, मुलांच्या शिक्षणाचा, औषधांचा व अन्य खर्च अशा अनेक समस्या अकस्मात उभ्या ठाकल्या आहेत. या वर्गाकडे ना समाजसेवी संस्थांची मेहरनजर ना सरकारची. मुले उपाशी झोपताना जीव तुटत आहे.

शहरात लॉकडाउन असल्याने रिक्षाचालकांवर व्यवसायास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या कमाईतून घरप्रपंच करणाऱ्या रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 15 एप्रिलपासून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू, असा विचार करत असतानाच, आता राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवल्याने रिक्षाचालकांसमोर जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. “करून खाणाऱ्यांवर भिकेची वेळ येईल की काय?’ अशी भीतीही रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.

संचारबंदीने उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्‍न पडला आहे. लॉकडाउनने व्यवसायावर परिणाम होत आहे. सुरवातीला रिक्षातून रुग्णांना ने-आण करण्यासाठी रिक्षा बाहेर काढत होते; परंतु आता पोलिस बाहेर येण्यास मनाई करीत आहेत. अशावेळी काय करावे अन्‌ काय खावे? सकाळी एकवेळ भाकरी केली की सायंकाळी फक्त भात शिजवून खावे लागत आहे.
– रमेश पांगसे, रिक्षाचालक, नाशिक

आम्हाला काम केल्याशिवाय भागत नाही. रिक्षा बंद असल्याने रिक्षाचे हप्ते कसे फेडायचे? घरी वृद्ध आईवडील आहेत, त्यांच्या औषधाचा खर्च, घरभाडे व मुलांच्या पुढच्या वर्षीचा शिक्षणाचा खर्च कसा करणार? अजून 30 एप्रिलपर्यंत आम्ही कसे तग धरणार?
-किरण पाटाेळे, रिक्षाचालक, नाशिक

घरात किराणा आणण्यासाठी पैसे नाहीत. दुकानदाराला मागील पेसे देणे बाकी आहे, ८ तारखेला पगार हाेत असताे. अजून पगारच झालेला नाही. हाेईल की नाही हा माेठा प्रश्न आहे. कसतरी जगताेय. कामधंदेच बंद असल्याने माझ्यासारख्यांवर जीवनमरणाचा प्रश्न उभा आहे.
-निलेश महाले, कर्मचारी, नाशिक.

बाहेर जाणेही मुश्किल आहे. कराेनामुळे सर्वच नियाेजम काेलमडले आहे. भाजीपाला मिळत नसून ताे घेण्यासाठी पैसे कमी पडत आहे. येणाऱ्या काळात काय पर्स्थिती हाेईल, याचा विचार करून पाेटात गाेळा येताे.
नवऱ्याची खासगी नाेकरी सुद्धा धाेक्यात आहे.
-मंदा काळाेगे, गृहिणी.

कराेना व्हायरसचा नायनाट झाला तरी, लाॅकडाउनमधून सावरण्यासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा आधिक महिन्याचा काळ व्यवस्थेला लागू शकताे. सध्या सर्वत्र नागरिक दबलेले आहेत. त्यांना माेकळीक नाही. घरात बसूनसुद्धा अनेकांना कंटाळा आला आहे. त्यातून अनेकांचा संयम सुटू शकताे.
-राहुल नाईक, एरिया मॅनेजर, फायनान्स कंपनी.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com