जेलरोड येथील दुहेरी हत्येच्या आरोपींना जन्मठेप
स्थानिक बातम्या

जेलरोड येथील दुहेरी हत्येच्या आरोपींना जन्मठेप

Gokul Pawar

नाशिक । येथे ‘मुलीसोबत बोलत थांबू नका’ असे सांगितल्याचा राग आल्याने टोळक्याने दोघांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. पी. देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 28 हजार रुपयांचा दंड ठोठावला. 16 जानेवारी 2016 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जेलरोड येथील भीमनगर परिसरात या दुहेरी हत्या झाल्या होत्या.

प्रवीण ऊर्फ विठ्ठल प्रकाश आव्हाड, आशिष ऊर्फ बाळा मच्छिंद्र पगारे आणि आतिष ऊर्फ काळू शाम पवार अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी सुमेध सुनील गुंजाळ आणि स्वप्निल शामराव दोंदे यांची लोखंडी पाईपने जबर मारहाण करून हत्या केली होती. 16 जानेवारीला सायंकाळी 5 च्या सुमारास सुमेध गुंजाळ याच्या घराजवळ आरोपी प्रवीण आव्हाड हा एका मुुलीसोबत बोलत होता. त्यामुळे नंदादीप भीमराव जाधव, सुमेध आणि स्वप्निल यांनी प्रवीणला घराजवळ थांबू नका, असे सांगितले.

त्याचा राग आल्याने प्रवीणने इतर आरोपींच्या मदतीने रात्री साडेदहाच्या सुमारास नंदादीप जाधव यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर या गुन्ह्यातील संशयित आरोपी समाधान ऊर्फ पप्पू अहिरे आणि नितीन ऊर्फ बाबा जगन जाधव यांच्यासह इतर तिघे आरोपी सुमेधच्या घरी गेले. तेथे सुमेधच्या घराची तोडफोड करून त्यांनी सुमेध व स्वप्निलला जबर मारहाण केली. गंभीर मार लागल्याने दोघांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवणे, प्राणघातक हल्ला, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षातर्फे के. एन. निंबाळकर यांनी युक्तिवाद केला.

साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने प्रवीण आव्हाड, आशिष पगारे आणि आतिष पवार या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 28 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ठोस पुरावे नसल्याने संशयित समाधान अहिरे आणि नितीन जाधव यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार के. के. गायकवाड, पोलीस शिपाई आर. आर. जाधव, महिला पोलीस हवालदार पी. आर. चौधरी यांनी पाठपुरावा केला.

Deshdoot
www.deshdoot.com