मनमाड : ‘आमची शाळा वाचवा’, विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र; पीएमओतुन मिळाले ‘हे’ उत्तर
स्थानिक बातम्या

मनमाड : ‘आमची शाळा वाचवा’, विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र; पीएमओतुन मिळाले ‘हे’ उत्तर

Gokul Pawar

मनमाड : येथील इंडियन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आमची शाळा वाचवा अशा आशयाचे पत्र चक्क पंतप्रधानांना लिहले आहे. चिमुकल्यांची ही आर्त हाक पंतप्रधान कार्यालयाने ऐकली असून या प्रकरणात संबधित अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान अनेक दिवसांपासून इंडियन स्कुल आणि रेल्वे प्रशासन या दोघांमध्ये जागेवरून वाद आहे. मनमाड शहरातील शिवाजी चौकाजवळ तब्बल ९८ वर्षे जुनी असलेली राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाची शाळा आहे. इथे बालवाडीपासून ते १२ वी पर्यत विद्यार्थी शिक्षण दिले जाते. सध्या शाळेची इमारत व मैदान याबाबत शाळा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये वाद निर्माण झाला असून शाळेची जागा आमची असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मध्य रेल्वेत मनमाड हे महत्वाचे जंक्शन स्टेशन असून येथून रोज सुमारे १५० प्रवासी रेल्वे गाड्यांची ये-जा होत असते. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढली असल्याने रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यासाठी आम्ही आमची जागा परत मागत असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. हा वाद कोर्टात देखील गेला असून जागा रिकामी करून देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रवेश द्वारावर नोटीस चिटकवली होती. त्यामुळे शाळेतील विदयार्थ्यांनी याचा धसका घेत ५० विद्यार्थ्यांनी पंतप्रधानाना पत्र पाठवून आमची शाळा तोडली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण हस्तक्षेप करून आमची शाळा वाचवावी असे पत्रात म्हटले आहे.

एकीकडे जागेचा वाद न्याय प्रविष्ट असताना दुसरीकडे मात्र आपली शाळा तुटणार असल्याचा धसका विद्यार्थ्यांनी घेतला आणि त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून शाळा वाचविण्यासाठी साकडे घातले असून त्यांच्या या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आल्याने विद्यार्थी काहीसे सुखावले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com