निफाड : वडाळीनजीक सलग दुसर्‍या दिवशी बिबट्या जेरबंद
स्थानिक बातम्या

निफाड : वडाळीनजीक सलग दुसर्‍या दिवशी बिबट्या जेरबंद

Gokul Pawar

भाऊसाहेबनगर। महाशिवरात्रीपासून परिसरात दहशत बसरविणारा बिबट्या वडाळी नजिक शिवारात रविवारी रात्री जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असताना आज पुन्हा वडाळी येथे तानाजी घोलप यांच्या शेतात पिंजर्‍यात रात्री 8 वाजता बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. दरम्यान, अद्याप या शिवारात दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

वडाळी नजिक शिवारात चार बिबटे मुक्त संचार करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. या पार्श्वभूमीवर तानाजी घोलप यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजर्‍यात रविवारी रात्री बिबट्या जेरबंद झाला असताना वन विभागाने पुन्हा त्याच ठिकाणी आज सकाळी पिंजरा लावला होता. या पिंजर्‍यात रात्री आठ वाजता बिबट्याची मादी जेरबंद झाली.

दरम्यान, मादी जेरबंद झाल्याचे रवींद्र शेवकर यांना समजताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वन रक्षक विजय टेकन वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी वन मजूर भैया शेख आदी सेवक घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद झालेल्या मादिला रात्री 9 वाजता वनविभागाच्या निफाड येथील रोपवाटिकेत आणण्यात आले. या परिसरात अद्याप बिबट्याचा मुक्त संचार असल्याने पुन्हा याच ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com