घोटी : वाघेरे शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाघेरे शिवारातील नदीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.

याबाबत वनविभागाच्या पथकाने पंचनामा केला असता या मृत बिबट्याच्या मानेवर असलेल्या जखमा पाहता दोन बिबट्यांच्या झुंजीत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील वाघेरे शिवारात तुकाराम सिताराम भोर यांच्या शेतामध्ये नदीकडे जाणाऱ्या पाची आंबे या परिसरात आज सकाळी नर बिबट्या जातीचा एक ते दीड वर्ष वयाचा बिबट्या मृत आढळून आला.

ही माहिती समजताच वाघेरे व परिसरातील ग्रामस्थांनी बिबट्या पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी केली आहे. बिबट्याच्या मानेला जखमा झालेल्या होत्या.

ही माहिती माजी सरपंच मोहन भोर व ग्रामस्थांनी इगतपुरी वनविभागाचे अधिकारी यांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर, भाऊसाहेब राव, वनरक्षक गाडर, घाटेसाव, सुरेखा आव्हाड, वनमजुर ठोकळ, वाळू आवाली आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.

घटनास्थळी पाहणी केली असता रात्रीच्या वेळी दोन बिबट्यांमध्ये झटापट, झुंज होऊन त्यात गंभीर जखमी झालेल्या या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. दुस-या बिबट्याचाही शोध घेण्याचे काम वनविभागाचे पथक करीत आहे

या मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी करून घोटी वनविभागाच्या हद्दीत त्याचे दफन करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *