दिंडोरी : देवठाण येथील महिलेवर बिबट्याचा हल्ला
स्थानिक बातम्या

दिंडोरी : देवठाण येथील महिलेवर बिबट्याचा हल्ला

Gokul Pawar

वणी : दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. रेशमा चंदर महाले (४५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत याबाबत मिळालेली माहीती अशी की, (दि. १६) रोजी देवठाण ता. दिंडोरी येथील महिला स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यास गेली असता जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सदर महिलेवर झेप घेत हल्ला चढविला. यात त्यांच्या मानेला, हातापायाला गंभीर जखमा झाल्या. दरम्यान हल्ल्यामध्ये या महिलेने सावध पवित्र घेत आरडाओरड केली. या आवाजामुळे जवळच असलेले त्यांचे पती चंदर महाले, मुलगा निलेश महाले, धनाजी महाले व उत्तम तुंगार घटनास्थळी धावून आले. हे बघताच बिबट्याने धुम ठोकली.

जखमी महिलेस वाणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांस प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com