सिन्नर : ठाणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

सिन्नर : ठाणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू
Stalking leopard

ठाणगाव । पाडळी येथील नायकाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात आज (दि.10) मध्यरात्री गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. जनावरांसोबत बांधलेल्या एका गोर्‍ह्याला बाजूच्या शेतात फरफटत नेऊन बिबट्याने त्याला ठार केले.

नारायण तबाजी रेवगडे यांनी आपल्या शेतात जनावरांसाठी झोपडीवजा गोठा बांधलेला आहे. सोमवारी (दि.9) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी जनावरे नेहमीप्रमाणे या गोठ्यात बांधली होती. या जनावरांना चारा पाणी करून ते गावातील घरी आले होते. आज पहाटे पाचच्या सुमारास ते जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले असता गोठ्यात बांधलली एक गाय, एक बैल व एक कालवड जागेवर आढळून आली. मात्र, एक गोर्‍हा गायब असल्याचे दिसले.

त्यांनी सकाळी सात वाजेपर्यंत शोध घेऊनही गोर्‍हा मिळून आला नाही. याबाबत त्यांनी आजूबाजूच्या शेतकर्‍यांना माहिती दिल्यावर ते देखील शोध घेऊ लागले. यावेळी गोठ्यापासून जवळच असलेल्या गव्हाच्या शेताकडे काहीतरी फरफटत नेल्याचे आढळून आले. शेतकर्‍यांनी मग काढला असता जवळच्या झुडुपामध्ये अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील गोर्‍ह्याचा मृतदेह आढळून आला.

वनकर्मचारी गोरख पाटील, शंकर शेटे यांना याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असून रेवगडे यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com