स्मार्ट चौकात डावेवळण ‘ब्लॉक’; वाहतूक कोंडीत भर
स्थानिक बातम्या

स्मार्ट चौकात डावेवळण ‘ब्लॉक’; वाहतूक कोंडीत भर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । नाशिककरांची हौस भागवणार्‍या स्मार्टरोडवरील स्मार्ट चौकात पुन्हा एका नव्या समस्येने तोंड वर काढले आहे. या चौकातून डावीकडे वळणार्‍या वाहनांसाठी मार्गच राहत नसल्याने वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे. यामुळे या चौकात पुन्हा तोडफोड करावी लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

गेली दोन वर्षांपासून स्मार्टरोडचे कवित्व सुरू आहे. सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणून या मार्गाकडे पाहिले जाते. चांगला मार्ग असतानाही त्याचा स्मार्टरोड करण्याच्या अट्टहासाने गेली दोन वर्ष नाशिककरांना वेठीस धरले आहे. अगोदरच धिम्या गतीने सुरू असलेले काम, याविरोधात झालेले आरोप, प्रत्यारोप, चौक बंद असल्याने म.गांधी रोड तसेच अशोकस्तंभ परिसरातील व्यापार्‍यांनी केलेले आंदोलन, तर शेवटी मिम्सद्वारे उडवलेली खिल्ली या सगळ्यातून अखेरीस घाईगडबड करून 26 जानेवारीला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्मार्टरोडचे उद्घाटन उरकण्यात आले.

त्यापूर्वीपासून सीबीएस, मेहर या चौकात उभे करण्यात आलेले सिग्नल व सीसीटीव्ही यंत्रणा अद्यापही सुरू झालेली नाही. परिणामी या दोन्ही चौकात वाहने आडवी घुसून वाहतूक कोंडी होतच आहे.

स्मार्ट रोडचे चौकही अतिशय स्मार्ट असावेत या हेतूने खास चौकांवर लक्ष केंद्रित करून काही महिने त्यावर खर्ची घालण्यात आले. यामध्ये सीबीएस चौकात मेळा बसस्थानकाकडून येणारा मार्ग, शिवाजीरोडने येणारे मार्ग या बाजुंनी रिक्षांसाठी खास मार्ग ठेवण्यात आला आहे. यामुळे उर्वरित त्रिकोणी भागात संपूर्ण प्लेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. याच्या परिणामी दोन्ही बाजुंनी डावीकडे वळण्यासाठी मार्गच राहिलेला नाही.

कोणत्याही चौकात सिग्नलवर लाल दिवा लागला असला तरी डावीकडे वळणार्‍या वाहनांना जाता येतेे. परंतु सीबीएस व मेहर या दोन्ही चौकांमध्ये अती सुशोभीकरणाच्या मोहात चौक मोठे आणि रस्ते छोटे झाले आहेत. सिग्नलजवळ वाहने उभी राहिल्यानंतर डावीकडे जाणार्‍या वाहनांना जागाच राहत नाही. तसेच सिग्नलसाठी वाहने थांबली असता शिवाजीरोडला आंबेडकर पुतळ्यापर्यंत तर पश्चिमेला मेळा बसस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. तीच स्थिती मेहर सिग्नलवर आहे. सिग्नल यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे.

दरम्यान वाहतूक पोलिसांनी ही बाब लक्षात येताच; स्मार्ट कंपनीला पत्रव्यवहाराद्वारे कळवले आहे. तसेच सिग्नलजवळ रस्त्याच्या डाव्या बाजुने दीड ते दोन फूट प्लेव्हर ब्लॉक तोडून रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. जेने डाव्या बाजूची वाहने पुढे जाऊ शकतील.परंतु आमचेच बरोबर आहे अशा अविर्भावात स्मार्ट कंपनीचे अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत.

स्मार्ट कंपनीच्या निदर्शनास आणून दिले
प्लेव्हर ब्लॉकचे फुटपाथ अधिक रूंद झाल्याने डाव्या बाजूने वळणार्‍या वाहनांसाठी जागाच राहात नाही. यामुळे सिग्नलवर मोठ्या रांगा लागत आहेत. सिग्नल यंत्रणेची चाचणी घेताना ही बाब निदर्शनास आली आहे. याबाबत स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष हे दाखवण्यात आले आहे. त्यांनी फुटपाथची रुंदी कमी करण्याची मागणी पोलीस प्रशासनाने केली आहे.
– सदानंद इनामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

Deshdoot
www.deshdoot.com