लग्नाचा थाट; नवरीची पाठवणी थेट बैलगाडीतून
स्थानिक बातम्या

लग्नाचा थाट; नवरीची पाठवणी थेट बैलगाडीतून

Gokul Pawar

देवळाली : सध्याच्या युगात हायटेक विवाह सोहळ्याकडे तरुणाईचा कल आहे. मात अशाही परिस्थितीत काही सुज्ञ पारंपरिक पद्धतीला पसंती देत असल्याचे दिसते. याची प्रचिती शिंगवे बहुला-अंबडवाडी गावात आली.

विवाह सोहळ्यात प्री-वेडिंग शूट, इव्हेंट मॅनेजमेंट, हेलिकॉप्टरमधून वधू-वरांची मिरवणूक अशा खर्चिक बाबी समोर येत असताना शिंगवे बहुला येथील गवळी व निसाळ परिवारातील सुशिक्षित युवकांनी बडेजाव न मिरवता पारंपरिक पद्धतीने वधूची पाठवणी बैलगाडीतून करून समाजापुढे जुन्या चालीरितीचा कमी खर्चाचा आदर्श ठेवला. शिंगवे बहुला गावात कै.संपत निसाळ यांचा मुलगा विजय तर लगतच्या अंबडवाडी परिसरातील तानाजी गवळी यांची कन्या सुवर्णा यांचा विवाह सोहळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये झाला.

यावेळी दोन्ही परिवाराकडून आहेर, मानाचे फेटे, उपरणे या गोष्टींना फाटा देण्यात आला. साध्या व कमी खर्चात परंतु हजारोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लग्नातील सर्व विधी आटोपल्यानंतर वधूच्या पाठवणीचा प्रसंग आला तेव्हा गहिवरून आलेल्या माहेरच्या लोकांनी चक्क बैलगाडीतून केलेली पाठवणी उपस्थितांना भावून गेली.

अशा प्रकारची पाठवणी 40 ते 50 वर्षांपूर्वी होत असे. परंतु काळ बदलला तशी साधने बदलली. त्यासह खर्चाचे प्रमाण वाढले. इतर करतात म्हणून आपणही केले पाहिजे, या ईर्षेने कर्जबाजारी होणारे वधूपिता नंतर कितीतरी काळ हप्ते फेडतात. मात्र निसाळ व गवळी परिवाराने डोळसपणे विवाह सोहळा करताना खर्चिक बाबी टाळल्या. त्याचे परिसरातून स्वागत होत आहे. समाजाने या आदर्शाचा अवलंब करणे काळाची गरज आहे.

पूर्वी लग्न सोहळ्यामध्ये अनेक प्रकार असायचे. त्यातून समाजाला प्रबोधनही केले जायचे. अलीकडच्या काळात ‘पॅकेज सिस्टिम’मुळे माणूस एकमेकांपासून दूर जाऊ लागले. त्यामुळे आपलेपणाचा अभाव दिसून येतो. या पार्श्वभूमीवर पुन्हा जुन्या चालीरितींना उजाळा देऊन समाज एकीकरणासाठी केलेला हा प्रयत्न भावी पिढीसाठी मार्गदर्शन करणारा आहे.
निसाळ-गवळी परिवार

Deshdoot
www.deshdoot.com