संत समागमची सांगता आज; १०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा होणार
स्थानिक बातम्या

संत समागमची सांगता आज; १०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा होणार

Gokul Pawar

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संत समागम सोहळ्याला राज्यातील तसेच देशातील लाखो भाविकांची उपस्थिती लाभत असून यामुळे धार्मिकनगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज शेवटचा दिवस असून या ठिकाणी १०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी आता सेवेकऱ्यांव्यतिरिक्त शहर आणि जिल्हावासीयांची पावलेही बोरगडकडे वळू लागली आहेत.

दरम्यान उत्तम व्यवस्थापन कौशल्य, सेवाभावीवृत्ती अन् विनयशीलता कशी असावी याचे दर्शन बोरगडमध्ये भरलेल्या संत निरंकारी समागमात घडत आहे. दरम्यान संत समागमामध्ये लावण्यात आलेली निरंकारी प्रदर्शनी आणि बाल प्रदर्शनी समागमाच्या तीनही दिवशी भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनून आहे. उल्लेखनीय आहे की, समागम परिसरातील माध्यमिक आश्रम शाळा, जैन चॅरिटेबल शाळा आणि होली अँजल शाळा या तीन शाळांमधील मुलांना संबंधित शाळांमार्फत बाल प्रदर्शनी पाहण्यासाठी पाठविण्यात आले होते. यापैकी एका संस्थेने त्यांच्या शाळेच्या प्रांगणात नियमित बाल सत्संग सुरु करण्याची सुद्धा विनंती केली आहे.

कायरोप्रॅटिक चिकित्सेचे एक शिबिर समागम स्थळावर लावण्यात आले आहे. त्यामध्ये १३ देशांतून आलेले ६० पेक्षा अधिक कायरोप्रॅटिक चिकित्सक आपल्या निष्काम सेवा प्रदान करत असून त्याचा लाभ दररोज सुमारे ३ ते ४ हजार लोक घेत आहेत. उपचार घेणाऱ्यांमध्ये निरंकारी भक्तगणांसह अन्य नागरिकांचाही समावेश आहे. ही उपचार पद्धती पाठीच्या कण्याशी निगडित आहे. आपल्या शरीरामध्ये उद्भवणाऱ्या प्रत्येक व्याधीचे मूळ पाठीच्या कण्याशी संबंधित असते. कारण शरिरातील सर्व मुख्य नाडयांचा थेट संबंध पाठीच्या कण्याशी असतो त्यामुळे कण्यामध्ये उद्भवलेला लहानसा दोषदेखील अनेक नसांना किंवा नाडयांना प्रभावित करतो.

कायरोप्रॅटिक चिकित्सेद्वारे पाठीच्या कण्यामध्ये निर्माण झालेला दोष दूर केला जातो ज्याचा सकारात्मक परिणाम प्राप्त होतो. यातील तज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, कायरोप्रॅटिक म्हणजे हाताद्वारे उपचार करणे होय. या उपचार पद्धतीने यु.एस.ए., कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये उपचार केले जात आहेत. भारतामध्ये कायरोप्रॅटिक इलाज करणारे ८ डॉक्टर्स सध्या नोंदणीकृत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com