परराज्यातील नागरिकांना एका ठिकाणी मिळणार वैद्यकिय तपासणी, परवानग्या

परराज्यातील नागरिकांना एका ठिकाणी मिळणार वैद्यकिय तपासणी, परवानग्या

नाशिक : लाँकडाऊन मुळे शहरात अडकलेल्या परराज्यातील विद्यार्थी तसेच नागरिकांना परत जाण्यासाठी आवश्यक परवानग्या, वैद्यकिय प्रमाणपत्र तसेच रेल्वे अगर बसची व्यवस्था प्रशासनाच्या समन्वयातून एकाच ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी सबंधितांनी आपल्या जवळील पोलीस ठाण्यांमध्ये नोंदणी करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्याठी उपाययोजना म्हणून शासन निर्णयानुसार दिड महिन्यापुर्वी लॉक डाऊन घोषित केला हाेता. यामुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात परराज्यांतील मजूर, विद्यार्थी, पर्यटक व इतर नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना त्यांचे मूळ राज्यात किंवा जिल्ह्यात पाठवण्याची व्यवस्था शासन करत आहे.

ज्यांना परत आपल्या राज्यात व जिल्ह्यात जायचे असेल अशांनी अथवा त्यांचे प्रतिनिधींनी प्रवास करणार्‍या नागरिकांचे नाव, सध्याचा पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व त्यांचा प्रवासाचा पत्ता अशी सर्व माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करावी.

ही माहिती जमा झाल्यानंतर संबंधित नागरिकांना शासनाच्या निर्णयानुसार रेल्वे उपलब्ध करून देणे किंवा राज्य परिवहन महामंडळाची एसटी बसेस मार्फत मध्यप्रदेश सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे.

पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या परराज्यात जाणारे प्रवासी यांनी संबंधित पोलिस ठाणे, शासकीय यंत्रणेच्या आदेशानुसार दिलेल्या ठिकाणी वेळेवर हजर राहणे अनिवार्य असणार आहे. तसेच प्रवास सुरू होण्याच्या ठिकाणी त्याची महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय तपासणी, स्क्रीनिंग करून नंतर त्यांना रवाना करण्यात येणार आहे.

यावेळी सामाजिक अंतर राखले जाईल, त्याचप्रमाणे शासनाने करोना विषाणु बाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत नागरिकांनी दक्षता घेणे तसेच शासनाच्या वतीने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून अनावश्‍यक गर्दी टाळून शासकीय यंत्रणेस सहकार्य करणे अपेक्षीत असणार आहे. अन्यथा अशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com