करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा अभिनव उपक्रम
स्थानिक बातम्या

करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा अभिनव उपक्रम

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी : खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते बियाण्यांची खरेदीसंदर्भात गैरसोय होऊ नये तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून किंवा आपसात चार ते पाच शेतकऱ्यांनी गट तयार करून मोबाईलद्वारे स्थानिक कृषी विक्रेत्याकडे मागणी करून शेतकऱ्यांना थेट बांधावर घरपोच बियाणे व खते उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे इगतपुरी तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तवर यांनी माहिती देतांना सांगितले आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अधिक दक्षता बाळगावी असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकऱ्यांतर्फे शेती मशागतीची कामे केली जात आहे. काही दिवसातच खरीप पीक पेरणीसुरु होण्याचे संकेत लक्षात घेता शेतकऱ्यांची खते बियाणे जुळवाजुळव सुरु झाल्याचे चिञ दिसून येत आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत कृषी सहाय्यक एस.डी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत नांदूरवैद्य, नांदगांव बुद्रुक आदी ठिकाणी बैठक घेऊन मार्गदर्शन सूचना जारी केल्या केल्या आहेत. तसेच कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी बाजारात येण्याचे टाळा.

आपणास लागणा-या बियाणे खतांची मागणी शासनाच्या संकेतस्थळावर नोदवल्यास किंवा स्थानिक कृषी सेवा विक्रेत्याकडे मोबाईलद्वारे मागणी केल्यास आपणांस घरपोच बियाणे व खते रास्त दरामध्ये आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रामार्फत पोहोचवल्या जातील.

खते व बियाणांची मागणी कशी करावी यासाठी कृषी सहाय्यक एस.डी.चव्हाण तसेच कृषी मिञ, प्रगतशील शेतकरी यांची मदत घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तवर यांनी केले आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट घरापर्यंत रास्त दरामध्ये बियाने व खते देण्याचा उपक्रम शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हाती घेतला आहे. त्यासाठी चार ते पाच शेतकऱ्यांनी गट तयार करून जवळच्या कृषी सेवा विक्रेत्याकडे मोबाईलद्वारे मागणी करून शेतकऱ्यांनी कृषी केंद्रात गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत. यासाठी काही मदत लागल्यास कृषी सहाय्यक व कृषीमिञांशी संपर्क साधावा.
-शितलकुमार तवर, कृषी अधिकारी इगतपुरी तालुका

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com