नव्या शयनयान एसटीमुळे प्रवाशांच्या अडचणीत भर
स्थानिक बातम्या

नव्या शयनयान एसटीमुळे प्रवाशांच्या अडचणीत भर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । राज्य परिवहन महामंडळ वर्षानुवर्षे तोट्यात जात असले तरी त्याच्याकडून नव्या एसटी व सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, आता नव्याने दाखल केलेल्या विनावातानुकूलित शयन-आसन एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडणार आहे. महामंडळाने सुरू केलेल्या नव्या एसटीत सवलत लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या उदासीनतेमुळे बारगळला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह सवलतीस पात्र असलेल्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसह एकूण 29 सवलत योजनांमधून 30 ते 100 टक्क्यांपर्यंत एसटीकडून तिकीट दरांत सवलत मिळते. सवलतीमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी शासनाकडून महामंडळाला हजारो कोट्यवधींचे अर्थ सहाय्य मिळते. मात्र नव्या एसटीमध्ये सवलत मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाला अध्यक्ष नसल्याने एसटीचे अनेक प्रस्ताव रखडले आहेत.

यातच परिवहन मंत्री पूर्ण वेळ नसल्याने महामंडळाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया देखील मंदावली आहे. यामुळे प्रवाशांना गैरसोयीच्या असलेल्या एसटीतून प्रवास करावा लागत आहे. शयन-आसन एसटी सुरू करतानाच सवलतीबाबत प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र शासन दरबारी एसटी महामंडळाला असलेला दुय्यम दर्जा लक्षात घेता प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

महामंडळात नव्याने दाखल झालेल्या विनावातानुकूलित शयन-आसन एसटीमध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशांना शयन-आसन एसटीमध्येही सवलतीचा लाभ घेता येईल, असे महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.

#मुद्दे
शयन-आसन एसटीची वैशिष्ट्ये
*30 आरामदायी पुश बॅक आसने व 15 शयनआसने
*चालक केबिनमध्ये उद्घोषणा यंत्रणा
*पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक
*मोबाइल चार्जिंगची सुविधा
*प्रत्येक शयनआसनाला स्वतंत्र फॅनची सुविधा
*आगीपासून सुरक्षितता मिळण्यासाठी आग प्रतिबंधक उपकरणे

रात्रीचा लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांची शयनयान बसला मागणी लक्षात घेता, एसटी महामंडळाने आसन आणि शयनयान बस महामंडळात दाखल केली. या पद्धतीच्या एकूण 200 बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या 200 बसमधून प्रवाशांना मिळणारी सवलतीला कायमचे मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com