नाशकातही बंदचे पडसाद; विविध संघटनांचा सहभाग
स्थानिक बातम्या

नाशकातही बंदचे पडसाद; विविध संघटनांचा सहभाग

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनतेच्या इच्छेविरोधी धोरणांच्या विरोधात आज देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये शहरतीलाही काही संघटना सहभागी झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील राज्य व केंद्र सरकारी सेवक, बँक व विमा सेवक, पोस्टल सेवक यांच्यासह औद्योगिक कामगार, अंगणवाडी – आशा सेवक तसेच नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायत सेवक संपात सहभाग घेणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा सेवक यातूून वगळण्यात आले आहेत. परंतु सुरक्षारक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तालुकास्तरावरूनही असंंघटित कामगार, शेतकरी व कष्टकर्‍यांद्वारे सुमारे वीस हजार लोकांचाही या मोर्चात सहभाग राहणार आहे. सकाळी ११ वाजता गोल्फ क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य जागृत शिक्षक-शिक्षकेतर संघटनेने संपाला जाहीर पाठिंबा

महाराष्ट्र राज्य जागृत शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ज्या शाळांना 20 टक्के अनुदान मिळत आहे त्यांना अनुदानाचा पुढचा 40 टक्केचा टप्पा त्वरित द्यावा, 1656 घोषित झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना 20 टक्के अनुदानाचा टप्पा आकस्मित फंडातून ताबडतोब द्यावा, मूल्यांकन झालेल्या शाळा तातडीने घोषित कराव्यात, डीसीपीएस टप्प्याच्या अनुदानावर असलेल्या व 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्प्याच्या अनुदानावर अथवा विनाअनुदावर होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, डीसीपीएस 2005 नंतर लागलेल्यांच्या बाबतीत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, शिक्षक मंजुरीचे निकष दुरूस्त करावेत, तुकडी ही संकल्पना पूर्ववत चालू करावी, 1980 चे निकष जसेच्या तसे लागू करावेत, शिक्षकेतर सेवकांचा आकृतिबंध पुनर्गठित करावा आदी मागण्या आहेत.

कामगार संघटनांचे शक्तिप्रदर्शन
केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व सार्वजनिक क्षेत्र कवडीमोल किमतीत भांडवलदारांना विक्री करत असल्याच्या विरोधात 8 जानेवारी देशव्यापी संपाच्या तयारीनिमित्त इनफ्लूम (रेन्फ्रो) इंडिया प्रा. लि. वाडीवर्‍हे या कंपनीच्या गेटवर कामगारांची गेट मीटिंग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

वाहतूक कामगार चालक- मालक संघटना
देशपातळीवरील ट्रेड युनियनच्या संपास संघर्ष वाहतूक कामगार चालक-मालक संघटनेचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या ठरावानुसार देशातील ट्रेड युनियनअंतर्गत येणार्‍या सर्व कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यात आला आहे. संपात सहभाग शक्य नसलेल्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या संघटनांचा सहभाग
या देशव्यापी संपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी या राजकीय पक्षांच्या संलग्न कामगार संघटना, सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई फेडरेशन, सर्व बँका, एलआयसी, जीआयसी, पोर्टट्रस्ट, डिफेन्स, सिव्हिल एव्हिएशन, बीएसएनएल, एमटीएनएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगार संघटना, बँक संघटना, देशभरातील 60 वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनाही या संपामध्ये सहभागी होणार आहेत. या बंदला देशभरातील 175 शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com