अवैध मद्यविक्री करणार्‍यास अवघ्या अकरा महिन्यांत शिक्षा
स्थानिक बातम्या

अवैध मद्यविक्री करणार्‍यास अवघ्या अकरा महिन्यांत शिक्षा

Gokul Pawar

नाशिक । राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा रोड येथे केलेल्या कारवाईनंतर न्यायालयाने अवैध मद्यवाहतूक आणि विक्री करणार्‍या आरोपीस अवघ्या 11 महिन्यांच्या कालावधित तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सुभाष राजू थापा (35, रा. नेपाळ) असे या आरोपीचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने 9 जानेवारी 2019 रोजी दोंडाईचा शहादा रस्त्यावर ही कारवाई केली होती. (पीबी 13 एएल 2672) क्रमांकाच्या ट्रकमधून थापा हा अवैधरित्या मद्यवाहतूक करीत असल्याचे पथकास आढळून आला. पथकाने ट्रकमधून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला परराज्यातील मद्यसाठा आणि ट्रक जप्त केला. तसेच थापा विरोधात गुन्हा दाखल केला.

शहादा येथील प्रथम वर्ग न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. पथकाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने थापा यास तीन वर्षे कारावास आणि 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यवाहतूक आणि विक्री करणार्‍यांवर कारवाई केली जात असते. मात्र या आरोपींना तातडीने शिक्षा मिळण्यास अडचणी येतात. मात्र सुभाष थापा यास अकरा महिन्यांत शिक्षा झाल्याने सर्वात कमी कालावधित शिक्षा मिळण्याची ही पहिलीची घटना असल्याचे विभागाने सांगितले. या शिक्षेमुळे विभागाचे मनोबल उंचावले असून अवैध मद्यवाहतूक किंवा विक्री करणार्‍यांवर अजून वचक निर्माण राहणार असल्याचे अर्जुन ओहोळ यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com