भाजीपाला वाहतूकीच्या नावाखाली अवैध मद्याची तस्करी
स्थानिक बातम्या

भाजीपाला वाहतूकीच्या नावाखाली अवैध मद्याची तस्करी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । भाजीपाला वाहतूकीच्या नावाखाली पिकअप या मालवाहू वाहनातून मद्याची अवैध वाहतूक नाशिक भरारी पथक क्रमांक 1 ने उघडकीस आणली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून या संशयीतांच्या ताब्यातील वाहनासह मद्यसाठा असा सुमारे 5 लाख 37 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन विभागाने गेली आठ दिवसांपसून कारवाया सुरू केल्या असून या अंतर्गत दादर नगर हवेली येथे विक्रीस असलेला मद्यसाठा शहरात आणला जात असल्याची माहिती पथकाचे दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त अर्जुन ओव्हळ व जिल्हा अधिक्षक डॉ.मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे,प्रविण मंडलिक,जवान विलास कुवर,धनराज पवार, सुनिल पाटील, श्याम पानसरे, अनिता भांड आदींच्या पथकाने सातपूर परिसरातील पपया नर्सरी भागात पथकाने नाकाबंदी करीत वाहन तपासणी केली असता बेकायदा मद्यवाहतूकीचा प्रकार समोर आला.

संदीप तुकाराम देवरे व देविदास जिभाऊ देवरे (रा. दोघे जायखेडा ता.सटाणा) या संशयीतांच्या ताब्यातील पिकअप (एमएच 04 जीआर 4931) वाहनाची तपासणी केली असता भाजीपाला वाहतूकीच्या नावाखाली संशयीत राज्यात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा वाहतूक करतांना मिळून आले.

त्यात इम्प्रीयल ब्ल्यू, डिएसपी ब्लॅक, ऑफिसर चॉईसस, किंगफिशर आणि ट्यूबर्ग बिअरचे बॉक्सचा समावेश आहे. पथकाने दोघांना बेड्या ठोकत वाहनासह मद्यसाठा असा सुमारे 5 लाख 37 हजार 280 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक सुत्रावे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com