सुरगाणा : व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून निराधारास ७१ हजाराची मदत
स्थानिक बातम्या

सुरगाणा : व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून निराधारास ७१ हजाराची मदत

Gokul Pawar

Gokul Pawar

सुरगाणा : सोशल मीडियाचा विधायक कामासाठीही उपयोग होऊ शकतो, याचा अनेकदा प्रत्यय येतो. अशीच एक सुखद घटना व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून घडली. तालुक्यातील बोरगाव येथील चंद्रकांत भरसट यांना ७१ हजारांची मदत व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यामातून करण्यात आली.

दरम्यान दीड महिन्यापूर्वी बोरगाव येथील चंद्रकांत भरसट यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून घर जळून खाक झाले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने भरसट कुटुंब उघड्यावर आले होते. यावेळी गावातील मित्रांनी एकत्र येत मदत करण्याचे ठरविले. यामध्ये अशोक गवळी, भास्कर भोये, आनंद पडवळ, लक्ष्मण बागुल, स्वप्निल आहेर, विनोद चव्हाण यांनी बोरगाव विचारमंच या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुटुंबीयास मदतीचे आवाहन केले.

त्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले. गावातील बाहेरगावी असणारे मित्रही यावेळी मदतीला धावून आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी फेरी काढून मदतीचा हात पुढे केला. याद्वारे एकूण ७१ हजार रुपयांची मदत जमा झाली. हि रक्कम चंद्रकांत भरसट व पत्नी कल्पना भरसट यांच्या हातात सुपूर्द केली आहे. यामुळे परिसरात कौतुक होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com