एकही सुट्टी न घेता होमगार्डचा सलग दोन महिने बंदोबस्त
स्थानिक बातम्या

एकही सुट्टी न घेता होमगार्डचा सलग दोन महिने बंदोबस्त

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिकरोड । होमगार्डसनी साप्ताहिक सुटी न घेता सलग दोन महिने बंदोबस्त करुन आदर्श घालून दिला आहे. त्यांना चांगले मानधनही मिळाले. असेच कष्ट करण्याची तयारी आहे. मात्र, नियमित बंदोबस्त मिळावा अशी त्यांची मागणी आहे. होमगार्डसना दिवसाला दोनशे रुपये मानधन होते. सहा महिन्यापूर्वी ६७० रुपये मानधन झाले.

नाशिक शहरात सध्या चारशे होमगार्डस आहेत. या होमगार्डसना यंदा २५ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर असे दोन महिने काम मिळाले. पोलिस आयुक्तालयाने त्यांना काम देण्यासाठी रोटेशन पध्दती ठेवली आहे. २५ डिसेंबर ते २४ फेब्रुवारीपर्यंत ग्रामीण भागातील दुसरी बॅच बंदोबस्तासाठी आली आहे. काही दिवसांपूर्वी होमगार्डसचे मानधन दिवसाला ६७० रुपये करण्यात आले. या हिशेबाने सुटी न घेता दोन महिने काम केलेल्या होमगार्डसना सुमारे चाळीस हजाराचे एकूण मानधन मिळाले. पहिल्यांदाच चांगले मानधन मिळाल्याने त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, पुढील दोन महिने काम नाही. या कालावधीत संसार कसा चालवावा याची त्यांना चिंता आहे. थोडे कमी मानधन चालेल परंतु, बाराही महिने काम द्या, अशी त्यांची मागणी आहे.

नाशिक शहरात होमगार्डसचे देवळाली कॅम्प, नाशिकरोड, नाशिक शहर, गांधीनगर असे चार युनिटस आहेत. शहरात एकूण सुमारे साडेतीनशे पुरुष व सुमारे शंभर महिला या दलात आहेत. ग्रामीण भागात 21 युनिटस आहेत. ग्रामीण भागातील होमगार्डसनाही दोन महिने काम मिळू लागले आहे. मालेगावात एका युनिटमध्ये चारशे होमगार्ड आहेत. दोन महिन्यापूर्वी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शहर आयुक्तालय तसेच ग्रामीण आयुक्तालयात 400 ते 700 होमगार्ड बंदोबस्तासाठी देण्यात आले.

आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे होमगार्ड देण्यात आल्याचे समजते. होमगार्डने बिट मार्शल, नाकाबंदी, चौकी बंदोबस्त, सीआर मोबाइल, पीटर मोबाइल आदी कामे पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन इमानेइतबारे करत चोख सतर्क बंदोबस्त बजावला. काही होमगार्डनी एटीएम फोड़ताना चोर तसेच मोबाइल स्नॅचर पकडला. त्यांना पोलिस आयुक्तांच्याहस्ते सन्मानितही करण्यात आले. सुटी न घेता दोन महिने बंदोबस्त करणे अवघड आहे. सुट्टी घेतल्यास त्या दिवसाचा रोजगार मिळणार नाही म्हणून होमगार्डस सुटी घेत नाहीत. एका महिन्यात दोन दिवस तरी पगारी साप्ताईक सुट्टी देण्यात यावी, अशी होमगार्डची मागणी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com