होळी : रंगपंचमीला महागाईचा रंग
स्थानिक बातम्या

होळी : रंगपंचमीला महागाईचा रंग

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । रंगपंचमीनिमित्त विविध रंग आणि पिचकार्‍यांनी शहरातील बाजारपेठा रंगून गेल्या आहेत. मात्र करोना व्हायरसमुळे चिनी वस्तूंची टंचाई निर्माण झाल्याने साहित्य मिळत नसल्याने भारतीय साहित्यास मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम किमतीवर झाला असून पिचकारी 20 ते 30 तर रंग 50 रुपयांनी महाग झाले आहेेत. त्यामुळे रंगपंचमीला महागाईचा रंग आल्याचे दिसत आहे.

रंगपंचमी खेळण्यासाठी सारेच सज्ज झाले असले तरी यंदाच्या रंगपंचमीला महागाईचा रंग आहे. यंदा बाजारपेठा विविध आकाराच्या पिचकार्‍यांनी व रंगांच्या साहित्यांनी सजल्या आहेत. छोटा भीम, पाण्याची टाकी आदी पिचकार्‍या यंदा धूळवडीचे आकर्षण आहेत.

रंगपंचमीला अवघे चार दिवस उरले असून पंधरा दिवसांपूर्वीच शहरातील सर्वच व्यापारी, दुकानदारांनी पिचकार्‍या, विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी दुकानात ठेवले आहेत. सध्या बाजारात लहान-मोठ्या साध्या पिचकार्‍या उपलब्ध आहेत. छोट्या पिचकार्‍यांपासून दोन लिटर रंग भरण्याइतपत पिचकार्‍यांचा यात समावेश आहे. मोबाईल, पबजी, तोफ, विमान, बाहुल्या, बंदुकी, प्राणी, पक्षी आदी आकाराच्या पिचकार्‍या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या पिचकार्‍यांच्या किमतीमध्ये 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.

मागील वर्षी 20 रुपयाला मिळणारी पिचकारी 30 ते 40 रुपयास मिळत आहे. लहान मुलांमध्ये आकर्षण असलेली छोटा भीम, डोरेमोन, शिनचेन, अर्जुन आदी कार्टून्सच्या पिचकार्‍या थेट 250 ते 300 रुपयांना विकल्या जात आहेत. रंगांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. मागील वर्षी 100 रुपये किलोने विकले जाणारे रंग यावर्षी 125 ते 170 रुपये किलोने विकले जात असल्याचे रंग विक्रेत्याने सांगितले.

आठ-दहा टक्क्यांचा नफा
रंग व पिचकार्‍यांचा व्यवसाय आठ ते दहा दिवसांचा असतो. यामुळे मागणी व पसंतीनुसार पिचकार्‍यांचे नमुने व्यापार्‍यांनी विक्रीस आणले आहेत. सण संपताच शिल्लक साहित्य तसेच जपून ठेवावे लागते. या काळात आठ ते दहा टक्क्यांचा नफा या व्यवसायात मिळतो. पिचकार्‍यांबरोबरच विविध प्रकारचे रंगही बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये खडी, पावडर, सिल्व्हर कलर, कॅप्सूल कलर यांचा समावेश आहे.

असे आहेत दर

रंग किंमत (किलोप्रमाणे)

पटाखा रंग 130 ते 170 रु.
साधा रंग 100 रु.
सेंटेड गुलाल 100 ते 120 रु.
लाल खडा रंग 130 ते 180 रु.

Deshdoot
www.deshdoot.com